बुलडाणा: खरीप हंगामादरम्यान गेल्या तीन-चार महिन्यापासून तर आजपर्यंत सुरू असलेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांचे शेतातील मूंग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका, भात तसेच संत्रा, डाळींब, द्राक्ष, केळी इत्यादी फळ पिकांचेही हाता-तोंडाशी आलेले पीक निघून गेल्याने नुकसान झालेले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी माजी मंत्री तथा जळगाव जा. मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संत्रा, डाळींब, द्राक्ष इत्यादी फळ पिकांनाही अतिवृष्टीचा फार मोठा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. संत्रा ह्या पिकाला विम्याची रक्कमही एकदम कमी प्रमाणात मिळत आहे. या पीक विम्याची रक्कम वाढवून देण्यात यावी. त्याचप्रमाणे काही भागात संत्रा पीक विमा मंजुरच केलेला नाही. तरी सदर पीक विमा तातडीने देण्याची गरज आहे.
बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून, काही शेतकरी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वेळेवर पीक विमा काढू शकले नाहीत. आज रोजी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात सर्वच पिकांचे हाता तोंडाशी आलेला मालही निघून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा व शासनाकडून त्वरीत पंचनामे करून हेक्टरी आर्थिक पॅकेज देण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार डाॅ.संजय कुटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.