नियमावलीचा अवलंब करून आदरातीथ्य सेवा द्याव्यात
बुलडाणा: जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार आदी सेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निश्चित करण्यात येईल त्या क्षमतेसह सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यासाठी पर्यटन विभागाकडून आदरातिथ्य सेवा सुरू करण्यासाठी नियमावली निर्गमीत करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार (कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, हॉटेल्स, रिसॉर्ट, क्लब, मधील अथवा बाहेरील एफ ॲन्ड बी परवानाधारक युनीट व आऊटलेटसह) आदरातीथ्य सेवा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपावेतो सुरू राहतील.
जिल्ह्यात घोषीत करण्यात आलेल्या व वेळोवेळी भविष्यात घोषीत केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार आदी आदरातीथ्य सेवा बंद राहतील. आदरातीथ्य सेवा देताना व प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. ऑक्सीमीटर व थर्मल गन ने तपासून केवळ कोविडची लक्षणे नसलेल्या ग्राहकास प्रवेश देण्यात यावा. प्रवेश करणऱ्या प्रत्येक ग्राहकाचे थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजावे. प्रवेश करणाऱ्या ग्राहाकाची पल्स ऑक्सीमीटरच्या सहाय्याने ऑक्सीजन पातळी मोजण्यात यावी. तसेच ऑक्सीजनची पातळी मोजण्यापूर्वी व मोजल्यानंतर ग्राहकाचे बोट सॅनीटाईज करून घेण्यात यावे. ऑक्सीजनची पातळी 95 टक्के पेक्षा कमी असलेल्य व तापमान 38 अंश सेल्सीअसपेक्षा जास्त किंवा फ्लूची लक्षणे असलेल्या ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा.
तसेच अशा ग्राहकांची वेगळी नोंद घेण्यात येवून स्थानिक स्वराज्य संस्थांना यादी द्यावी. आदरातीथ्य देताना मालक, चालक, कर्मचारी व ग्राहकाने चेहऱ्यावर मास्क लावावे. ग्राहकांना हॅन्ड सॅनीटायझर उपलब्ध करून द्यावे. ग्राहकाकडून शक्यतो डिजीटल पद्धतीनेच देयक घ्यावे. किचनमधील सर्व साहित्य हे गरम पाण्याने व फुड ग्रेड अथवा ॲप्रोव्हड डिसइन्फेक्शनच्या मदतीने धुण्यात यावे. बफेट सुविधा बंद ठेवण्यात यावी. कापडी रूमालांच्या ऐवजी चांगल्या गुणवत्तेचे डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर करण्यात यावा. दररोज आरामकक्ष व हात धुण्याची ठिकाणी ठराविक वेळेनंतर निर्जतुकीकरण करून घेण्यात यावे.
मेनू कार्डमध्ये केवळ शिजलेले खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात यावा. दोन टेबलांच्या मध्ये एक मीटर चे अंतर ठेवणे आवश्यक आहे. आदरातीथ्य सेवा देणाऱ्या ठिकाणी दिवसातून किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. तसेच आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क किंवा समतुल्य मास्क द्यावा. गर्दी टाळण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी ग्राहकांनी आरक्षण पद्धतीचा वापर करावा. प्रतीक्षालयात प्रतीक्षा करताना सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. ग्राहकांनी सेवा घेण्यासाठी येतांना बाहेरील खाद्यपदार्थ व पेय आणू नये.
आदरातीथ्य देणाऱ्या आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन तापमान व काही लक्षणे दिसल्यास त्याबाबत परीक्षण करण्यात यावे. कफ, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्ररित्या नोंद ठेवण्यात यावी. एखादा कर्मचारी कोविड बाधीत झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ सदरचा परीसर निर्जंतुकीकरण करून घ्यावा. विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांची किंवा सदर आदेश अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, भारतीय साथरोग अधिनीयम 1897 व भारतीय दंडसंहीतेनुसार कारवाईस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी यांनी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.