शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा – अब्दुल सत्तार

0
256

धुळे: शिंदखेडा तालुक्यात सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल कृषी विभागाने सादर करावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा येथे ऑक्सिजनयुक्त बेड तयार करावेत, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
पालकमंत्री श्री. सत्तार आजपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयातील सभागृहात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, महाराजस्व अभियान, सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित तालुकास्तरीय बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुमताई निकम,  मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सुदाम महाजन, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे किट वितरण, कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर करावा. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे राहिले असतील त्यांचेही पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. या कामाचा उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल यांनी आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या मोहिमेची अंमलबजावणी करताना समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घ्यावा. तसेच या मोहिमेची वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेचा वापर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

Previous articleअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Next articleबुलडाणा: जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू ; सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत वेळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here