- शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचे संरक्षण करावे
बुलडाणा : नागपूर वेधशाळेकडून प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोंबर 2020 दरम्यान परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही भागात 10 ऑक्टोंबर रोजी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 11 व 12 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. तसेच 13 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे
तरी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची कापणी, मळणी किंवा सोंगणी केली असल्यास त्या पिकांचे संरक्षण करावे. सोयाबीन पिकांच्या सुड्या झाकून ठेवाव्यात. मका, ज्वारी पिकांची कापणी केली असल्यास तात्काळ झाकून ठेवून संरक्षीत करावी. कापसाची वेचणी करून तोसुद्धा सुरक्षीत ठेवावा. कापूस वेचणीस आला असल्यास विनाविलंब कापसाची वेचणी करून घ्यावी. जिल्ह्याच्या वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पुर्वउपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.