राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांचे गुरूदेव भक्तांना आवाहन
शेगाव : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्व संतस्मृति मानवता दिन ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे नियोजित करण्यात आला होता; परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व धार्मिक महोत्सव, धार्मिक स्थळे यावरील शासनाची कायम असलेली बंदी लक्षात घेऊन विविध गावांतील गुरूदेव भक्तांनी त्यांच्या गावातच कोविड नियमांचे पालन करून गुरुमाऊलीला श्रध्दांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे केंद्रीय पदसिध्द सदस्य राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांनी गुरुदेव भक्तांना केले आहे.
पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ जिल्हा शाखेची बैठक केंद्रीय पदसिध्द सदस्य तथा राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांचे मार्गदर्शनाखाली येथील ग्रामगिता सभागृहात पार पडली. पुण्यतिथी महोत्सवातील अत्यंत भावस्पर्शी व शिस्तबद्ध रित्या मौन श्रध्दांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम होतो. या मौन श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाच्या दिवशी गुरुमाऊलीला अभिवादन करण्यासाठी लाखो भाविक श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे उपस्थित राहतात. या कार्यक्रमात लाखो भाविक उपस्थित राहत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे न येता राज्यातील विविध गावांतील श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या कार्यकर्त्यांनी व गुरुदेवभक्तांनी ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी आपापल्या गावातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रध्दांजली अर्पण करावी.असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हा सेवाधिकारी गणेश जवंजाळ, जिल्हा प्रचार प्रमुख वासुदेव दामधर,सरचिटणीस मनिष देशमुख, जिल्हा महिला प्रमुख सौ अपर्णाताई कुटे, जिल्हा भजनी प्रमुख रामदास महाले, युवक प्रमुख राम देशमुख, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अनिल उंबरकार, कोषाध्यक्ष अतुल उमक, जिल्हा सदस्य विनोद वेरूळकर, प्रा. हरीदास आखरे, प्रकाशसेठ ढोकणे, जुगल राठी, पांडुरंग टाकळकर, रामगोपाल तायडे, राजेश जवंजाळ, अनंत तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.