मोरवाहीचा पुल
मोरवाहीशी माझे तसे जुने नाते, ऋणानुबंध! या गावाची आज आठवण म्हणजे, विधानसभेच्या निवडणूकीत मोरवाहीच्या पुलाची झालेली चर्चा!
माझा जन्म, आमचे जुने गांव, मोरवाहीचा! आमचे कुटूंब मोरवाही वास्तव करीत असल्यांने आई—वडिलांना व्यवसायाच्या निमीत्ताने, भाऊ—बहिणींना शिक्षणाच्या निमीत्ताने आणि माझे त्यांचेसोबत मूलला येणे—जाणे असायचे. मोरवाही—मूल दरम्यान उमा नदी धावते. आता नाही पण पुर्वी या नदीला एप्रिल—मे वगळता उर्वरित दहाही महिणे पाणी असायचे. फेब्रुवारी ते जूनच्या दरम्यान मोरवाहीचे सर्वच नागरीक बाजार हाट करण्याकरीता, खरेदी—विक्रीकरीता जुन्या कोसंबीच्या बाजूने शेतधुर्याच्या काठा—काठाने नदीतून पायी प्रवास करायचे. आम्हीही याच मार्गाने ये—जा करायचो. त्रास व्हायचा, विशेषत: उन्हाळ्यात नदीतून जाताना गरम रेतीचे चटके बसायचे पण उपाय नव्हतो.
या मार्गाशिवाय दुसरा मार्ग होता, रेल्वे लाईनने मूलला पोहचण्यांचा. पावसाळ्यात सारेच मोरवाहीचे नागरीक रेल्वे लाईनने येणे—जाणे करायचे. पुलावरून येताना—जातांना धोका होता. कधी मध्येच रेल्वे येईल आणि आपण अडकू शकू अशी भिती मनात असायची. या भितीतूनच घाई—घाईत रेल्वे पुल जीव धोक्यात घालून ओलांडावे लागे. अनेकदा सायकल घेवूनही पुलावरून येण्या—जाण्यात त्यावेळी मजा यायची पण आता ते दिवस आठवले की, अंगावर शहारे येतात. त्यातही, या पुलाजवळ असलेल्या मोठ्या वडाचे झाडावर भूत असल्याची त्यावेळी सर्वत्र चर्चा, रेल्वेची भिती, उंच पुल असल्यांने खाली पहायची सोय नाही, रेल्वेच्या दोन रूळावरून सायकल चालवित पुल पार करणे, या पुलावरून खाली रेल्वे लाईनच्या छोट्याश्या चिंचाळी पायवाटेवरून सायकल चालविणे म्हणजे जीवांशी खेळणेच होते. सवयीचा भाग झाल्यांने, भिती तशी नव्हती, मात्र केव्हा अपघात होईल याची शाश्वती नव्हती.
असेच एकदा, मोरवाहीला नामदेव राऊत नावाचे शिक्षक पहिल्यांदाच रूजू होण्यास आले. जुलै महिणा असल्यांने, त्यांना पुलावरूनच प्रवास करावा लागला. आपली किरायाची सायकल रेल्वे पुलावर चढविली, पाय घसरला आणि खाली पडले. गंभीर जखमी झालेत, पाय मोडला. असे अनेक अपघात या रेल्वे पुलाने पाहीले आहेत.
मोरवाहीवरून, मूलला येणे—जाणे करण्यांसाठी हाच जवळचा मार्ग होता. अधिकृत मार्ग मोरवाही—बेलघाटा—मूल असा होता. मूल—मोरवाही या पाच किलोमिटरच्या अंतराकरीता 16 किमीची अंतर पार करावा लागे. कालांतराने, गावकर्यांजवळ दुचाकी वाहणे आलीत, चारचाकी वाहणेही आलीत. ही वाहणे बेलघाटा मार्गे धावू लागली. याला पर्याय शोधतांना श्रमिक एल्गारचे काम करताना, मोरवाही—चितेगांव हा पारंपारिक रस्त्याचे काम मी मंजूर करवून घेतले होते. या रस्त्याचे काम जवळपास पुर्णत्वास येण्याआधीच सुधीर मुनगंटीवार यांनी मोरवाहीचे नदीवर पुल बांधण्याचा शब्द दिला. एका लहान गावाकरीता मोठा पुलाचे काम होईल असे कुणी स्वप्नातही बघीतले नव्हते. मात्र मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. मोरवाहीच्या नदीवर पुल तयार झाला. एकदा कुटूंबासह मोरवाहीला याच पुलावरून चारचाकी वाहनाने जाण्याचा योग आला. मनाला खूप आनंद झाला. रेल्वेच्या पुलावरील, नदीतील पाण्यातून केलेला पायी प्रवास, अनवाणी गरम रेतीतून पायाला पळसाची पाने बांधून केलेला प्रवासही नकळत स्मृती जाग्या करून गेला.
केवळ मोरवाही वासीयांच्या प्रेमापोटी बांधलेल्या या पुलावरून आता बेलघाटा, चिखली, राजोली, मारोडा डोंगरगावचे नागरीकही मूलचा अतिरिक्त प्रवास टाळून थेट प्रवास करीत आहेत. नागपूर रोडवरील गावातील नागरीकांना सोमनाथ येथे जाण्याकरीता या पुलाचीही चांगलीच सोय झाली आहे.
खरचं, सुधीर मुनगंटीवार या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी नसते तर, खरचं हा पुल तयार झाला असता काय? माझे सारख्याच किती पिढ्या त्या रेल्वेच्या जीवघेण्या पुलावरून प्रवास करून जीव धोक्यात घातले असते?
मूल, मोरवाही