केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन बल्लारपूर मतदारसंघात रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

0
42

दुर्गापूर – सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या. त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन अधिक वेगाने धावण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) केले. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘मी ४० वर्षांपासून चंद्रपूरला येतोय. गेल्या काळात चंद्रपूर पूर्णपणे बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात सुधीरभाऊंनी अत्यंत चांगले काम केले आहे. स्व. रतन टाटांचा अलीकडेच मृत्यू झाला. पण ते हयातीत असताना एकदा मला भेटले आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी बोलत होते. चंद्रपूरला चांगले इंजिनियरिंग कॉलेज झाले पाहिजे आणि सर्वसुविधायुक्त असे कॅन्सर हॉस्पिटल झाले पाहिजे, यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यांना आमचे ट्रस्ट सहकार्य करणार असल्याचे रतन टाटांनी सांगितेल. मला तेंव्हा खूप आनंद झाला. सुधीरभाऊंनी जिल्ह्यामध्ये उत्तम बगिचे केले, खेळाची मैदाने केली, उद्योग आणले. ताडोबाला आंतरराष्ट्रीय नकाशावर महत्त्व प्राप्त करून देण्याचे काम मुनगंटीवार यांनी केले आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम त्यांनी राबविला.’

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून जागतिक विक्रम केला. 50 कोटी झाडे लावणारा, पर्यावरणासाठी मोठे योगदान देणारा देशातील पहिल्या क्रमांकाचा नेता म्हणून सुधीरभाऊंचा उल्लेख होतो. रस्त्याच्या बाजुला झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करण्यासाठी मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सुधीभाऊंकडे पाठवले आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले.’ 2014 पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. मात्र गेल्या दहा वर्षांत 474 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग नव्याने निर्माण झाले. याचे श्रेय सुधीरभाऊंनाच आहे. आता सुधीरभाऊंच्याच प्रयत्नांमुळे समृद्धी महामार्गालाही चंद्रपूरशी जोडले जाणार आहे, याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.

सुधीरभाऊ म्हणजे चंद्रपूरचे भविष्य बदलवणारा नेता

सुधीरभाऊंनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रात काम करताना पायाभूत सुविधा विकसित केल्या. महाराष्ट्रात सर्वांत चांगले काम करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल असे काम त्यांनी केले आहे. जातीवाद न करता चंद्रपूर जिल्ह्याचे भविष्य बदलवण्याची क्षमता असलेला आणि विकासासाठी तळमळीने काम करणारा लोकनेता लोकप्रतिनिधी सुधीरभाऊंच्या रुपात पुन्हा एकदा लाभेल. ते पुन्हा मंत्री होतील आणि विकासाची बुलेट ट्रेन तीन पटींनी वेगाने धावे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील प्रगतीशील जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.

प्रत्येक पाऊल मतदारसंघाच्या विकासासाठी – ना. श्री. मुनगंटीवार

मी गडकरींचा शिष्य आहे. जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहो.आम्ही सदैव विकासाचे राजकारण करतो, जातीवादाचे नाही. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझे प्रत्येक पाऊल मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, असा निर्धार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पाच हजार घरकुल आणले. कुणीही कच्च्या घरात राहणार नाही, याचा निर्धार मी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एनटी कुणीही असले तरीही पक्के घरकूल देणारच आहे, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मित्तल ग्रुपसोबत 40 हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. पाच हजार एकरमध्ये हा उद्योग उभा होणार आहे. यातून 20 हजार थेट तर 80 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत, असेही ते म्हणाले.

महायुतीचे सरकार आल्यानंतर ओबीसी, एससी, एसटी कुणीही असले तरीही व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य व्याजाने देण्याचे आम्ही ठरविले आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

Previous articleप्रस्थापित उमेदवार पोहोचले आपल्या प्रचाराच्या नीच पातळीवर, अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनर वर केली शेणफेक
Next articleप्रचार वाहनांतून पडल्याने उमेदवार केशव रामटेके जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here