चंद्रपूर शहरात रेल्वे स्टेशनजवळ बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य आणि आकर्षक असे स्मारक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आले. वीरता, शूरता आणि प्रामाणिकतेचा अपूर्व संगम असलेल्या आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे, अशी भावना ना. सुधीर मुनगंटीवार यांची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला आणि आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान सुरु केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गरीब, वंचित, शोषितांबाबत नेहमीच संवेदनशील असतात. समाजातील प्रत्येक गरजू, गरीब घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊन ते अहोरात्र काम करीत आहेत. शासन शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभाच्या योजना पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला ठळकपणे दिसून येतात. देशातील प्रत्येक गरजू घटकाचा विकास घडवून आणणे, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे, हाच ध्यास ठेवून केंद्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.