मूल, २४ ऑगस्ट २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील एका निराधार विधवा महिलेला शिलाई मशीन व संबंधित साहित्य भेट देवून समाजसेवेच्या कार्याला एक नवा आयाम दिला आहे. त्यांच्या या मदतीमुळे त्या निराधार महिलेला मोठा आधार मिळाला असून, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी महत्त्वाची मदत झाली आहे. त्यामुळे येसनकर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, आणि त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
आकाश येसनकर हे दरवर्षी कुठलाही बडेजाव व दिखावा न करता गोरगरीब आणि निराधारांना मदत करून आपला वाढदिवस साजरा करतात. यावर्षीही त्यांनी विद्या गोवर्धन (गुरनुले) या विधवा निराधार महिलेला मदतीचा हात दिला, ज्यामुळे त्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकण्यास प्रोत्साहित झाल्या आहेत. या मदतीने विद्या यांना स्वत:च्या व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सशक्त व स्वावलंबी होईल. येसनकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला.
गतवर्षी येसनकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिले होते आणि वृद्धाश्रमात आपला वाढदिवस साजरा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या उपक्रमामुळे मूल शहरात समाजसेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष मंगेशभाऊ पोटवार, युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, महिला शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम, मालाताई शेंडे, उषाताई शेंडे, रोहित शेंडे, कृणाल चिकाटे, गोलु दहिवले, अक्षय वाळके, सायक खोब्रागडे, अजय दहिवले, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.