(“साप चावल्यावर दवाखान्यात जा अंधश्रद्धेच्या नादी लागून जीव गमावू नका.” जिवेश सयाम यांचे मार्गदर्शन.)
तळोधी (बा.):
महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळोधी-बाळापूर येथे सर्प व अंधश्रद्धा या विषयावर स्वाब संस्थेचे सर्पमित्र जिवेश सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली एक शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सयाम यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील सर्पांचे विविध प्रकार, त्यांचे विषारी किंवा बिनविषारी स्वरूप, तसेच सापांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि सापांची महत्त्वपूर्ण भूमिका या सर्व गोष्टींवर सखोल माहिती दिली.सापांना आपण नेहमी शत्रू म्हणून पाहतो, पण ते खरंच आपले शत्रू आहेत का किंवा पर्यावरण संवर्धनात त्यांची भूमिका काय आहे, यावरही त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. सापांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणावर कोणते सकारात्मक परिणाम होतात, हे विविध स्लाईड्स व चार्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच “साप चावल्यावर आधी दवाखान्यात जा अंधविश्वासाच्या व मांत्रिकाच्या नादी लागून आपले जीव गमावू नका.” असेही त्यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांचा सापांबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उन्मेषजी भाऊ गेडाम, सरचिटणीस सौ . मालतीताई गेडाम मॅडम, मुख्याध्यापक श्री. बुलबुले सर, उपमुख्याध्यापक श्री. कोराने सर, तसेच पर्यवेक्षक श्री. कोहपरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. *स्वाब नेचर* *फाउंडेशन* , तळोधी-बाळापूर यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा प्रभावीपणे पार पडली. श्री. जिवेश सयाम हे स्वतः स्वाब नेचर फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते व सर्पमित्र असून, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ते अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन स्वाब संस्था सतत परिसरातील शाळा कॉलेज मध्ये करीत असते. विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाबद्दलच्या समजुतीत या कार्यशाळेमुळे भर घालण्यात आली असून, अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन भविष्यात वारंवार करावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.