चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चिचपल्ली येथिल तलावाची पार फुटल्याने संपूर्ण गावात पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे चिचपल्ली गावातील असंख्य कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिचपल्ली, पिंपळखुट येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप केले तसेच चिचपल्ली येथील नुकसानग्रस्त नागरिकांना जेवणाची सोय करून दिली. ज्या कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली अशा कुटुंबांना संतोषसिंह रावत यांनी आर्थिक मदतही केली. प्रशासकीय स्तरावरून पुन्हा मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्न करणार असेही आश्वासन नुकसानग्रस्त कुटुंबाला रावत यांनी दिले.