चंद्रपूर
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे. वायगाव, निंबाळा आणि मामला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
“बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना, विद्यार्थ्यांना मूलभूत बस सुविधा मिळत नव्हत्या, ही अत्यंत खेदाची बाब होती. यापुढे तरी परिवहन महामंडळ प्राथमिकता ठरवून खर्च करेल अशी आशा आहे” अशी प्रतिक्रिया त्यांच्या कडून आली.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अपुऱ्या बस सुविधा आणि अनियमित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे तास सोडून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. “हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम करत होते,” असे त्यांनी नमूद केले.
डॉ. गावतुरे यांनी परिवहन महामंडळाला सल्ला वजा सूचना देत त्या म्हणाल्या कि, “अमाप आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळण्याऐवजी, सरकारने गरीब आणि सामान्य जनतेच्या आवश्यक गरजांवर लक्ष केंद्रित करायला हवे.”
सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे मनापासून आभार मानले आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर तातडीने कारवाई केल्याबद्दल आभार मानले.