बातमी संकलन:- यश कायरकर
नागभीड: स्थानिक सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे विविध उपक्रमांनी नविन शैक्षणिक सत्रातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेत उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना योग विषयाची माहिती व उपयुक्तता सहा.शिक्षिका किरण वाडिकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विषद केली. सहा. शिक्षिका आशा राजूरकर, पूजा जिवतोडे, मेघा राऊत, श्रद्धा वाढई यांनी विदयार्थ्यांना योगाचे धडे दिले.
संस्थाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून दिपप्रज्वलन केले. यावेळी शारदा वंदनेने सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व पाहुण्यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे औक्षवण करण्यात आले व प्रमुख अतिथी संजय गजपुरे, शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे व सर्व शिक्षकांच्या उपस्थिती मध्ये प्रथम दिनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तोंड गोड करून नविन पुस्तकांचे वाटप करण्यात आले .
दुपारच्या सत्रात शाळेचे सहा. शिक्षक पराग भानारकर यांनी भारतीय कृषी दिन, भारतीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधत सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर सहा. शिक्षिका पूजा जिवतोडे, किरण वाडीकर, आशा राजुरकर यांनी स्फूर्ती गिते गात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला . शाळेच्या शेवटच्या सत्रात नवागत विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गोड जेवणाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर, सहा. शिक्षक आशिष गोंडाने, सतीश जिवतोडे, यांनी विशेष मेहनत घेतली.