मूल :- गुणवसंत विद्यार्थानी आपली करिअर निवडतांना व्यावसायीक क्षेत्राचाही विचार करावा असे आवाहन मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री. राठोड यांनी केले. ते प्रेस क्लब मूलचे वतीने आयोजीत गुणवंत गौरव सोहळ्यांत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पूर्वीपेक्षा आता करिअरची माहीती घेणे अधिक सोपे झाले आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्यासंबधीचे शेकडो व्हिडीओ युट्यूब सारख्या माध्यमात उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून चांगल्यात चांगले करिअर घडविणे आता सोईचे झाले असल्यांने, ज्यातून आपल्या मनाला आनंद मिळेल असा करिअरच्या दिशेने विद्यार्थानी मार्गाक्रम करावे असेही मत श्री. राठोड यांनी व्यक्त केले.
आपण आपले लक्ष निश्चित केले आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर, आपण जीवनांत यशस्वी होवू शकतो, असे मत वनपरिक्षेत्राधिकारी श्री. कारेकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना व्यक्त केले.
गुणवंताचा गौरव, हा विद्यार्थ्यांना त्यांचे करियर करण्यास प्रोत्साहन देते, कोणतेही विषय असो, आपण एकरूप होवून त्या विषयाचे ज्ञान घेतले तर, आपण प्रगती निश्चित करू शकतो, असे नायब तहसिलदार ओंकार ठाकरे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना सांगीतले.
प्रेस क्लब मूलच्या वतीने आज मूल पंचायत समितीचे सभागृहात ‘गुणवंताचा गौरव 2024’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. वर्षा पिपरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय सिध्दावार, जेष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, स्नेहबंधचे कार्याध्यक्ष निलेश राय, साई मित्र परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या मंगला आत्राम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मूल येथील तन्वी कैलाश चलाख या विद्यार्थीनीला आयआयटी या नामांकीत संस्थेत प्रवेश मिळविण्यात यश मिळाल्याने तीचा सत्कार करण्यात आला. तन्वीने आपले मनोगत व्यक्त करतांना, आपल्याला जे करायचे ते आपण ध्येय बाळगा असे आवाहन करण्यात आले.
माध्यमिक शालांत परिक्षेत मूल तालुक्यातील 18 शाळांमधील प्रथम आणि द्वितीय गुणवंताचा तसेच तालुक्यातून प्रथम तीन दिव्यांग गुणवंताचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अमीत राऊत यांनी तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र सुत्रपवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सतिश राजूरकर, शशीकांत गणवीर, सचिव कुमूदीनी भोयर, नासीरभाई, राजू वाढई, प्रकाश चलाख, नितेश मॅकलवार, प्रमोद म्हशाखेत्री, दत्ता वारानशीवार यांनी परिश्रम घेतले.