खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला:नोंदणी आवश्यक
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गरोदर माता व नवजात बालक रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु केले आहे. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिका वापरता येईल. अशा वाहनाचे भाडे प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे संबधित रुगांनाच्या खात्यात रक्कम अदा केल्या जाईल. याकरीता रुग्णाला ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक यांनी दिली.
प्रसुती पश्चात 42 दिवसपर्यंतच्या गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या नवजात बालकांना तातडीच्या उपचाराकरीता शासकीय व खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता रुग्णांना ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ डाऊनलोड करुन नोंदणी करणे आवश्यक राहिल. ज्या रुग्णाने खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिकेचा वापर केला असेल अशा संबधीत रुग्णांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचल्यानंतर बँकेचे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा स्त्री रुग्णालयात जमा करावी. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाहन भाडे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. शासकीय रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास लाभ मिळणार नाही तर खाजगी वाहण किंवा रुग्णवाहिका वापर करताना ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल यांची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले दर याप्रमाणे : मारूती व्हॅनचे महानगर पालिका क्षेत्रातील दर पाचशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार रुपये व जिल्ह्याबाहेर 11 रुपये प्रति कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा सुमो व मॅटॅडोरचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार 400 रुपये तर जिल्ह्याबाहेर 12 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा 407 किंवा स्वराज मझदाचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सातशे प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगरपालिका क्षेत्र सोडून 1 हजार 300 रुपये तर जिल्ह्याबाहेर 13 रूपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. आय.सी.यु. अथवा वातानुकूलीत वाहनाचे महानगरपालिका क्षेत्र सोडून व जिल्ह्याबाहेर वातानुकूलीत यंत्रणा बसविली असल्यास नमूद दरात 15 टक्के वाढ देय राहिल. तसेच 100 कि. मी. च्या वर 15 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे रक्कम संबंधीतांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा करण्यात येईल, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.