बुलडाणा: सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दि. 26 सप्टेंबर रोजी व्हीसी द्वारे घेतला आहे.
यावेळी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे, जिल्हाधिकरी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ घोलप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, जिल्हा परिषद उप मुख्याधिकारी राजेश लोखंडे, अति जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ राजेंद्र सांगळे, न प मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी मुख्यमंत्री महोदयांना जिल्ह्यातील मोहिमेची विस्तृत माहिती दिली. तर यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे म्हणाले, या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून स्थानिक लोकप्रतिनिधी यात आपला सहभाग नोंदवत आहे. या मोहिमे अंतर्गत आम्ही नो मास्क नो एंट्री, नो मास्क नो जर्नी हे उपक्रम राबविणार असून स्थानिक लोक कलावंताच्या माध्यमातून देखील याची जनजागृती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुरु केलेले हे अभियान अतिशय चांगले असून निश्चितच याचा फायदा सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन नंतर आता तरुण पिढी कामासाठी घराबाहेर पडत आहे. त्यामुळे आता जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. लस केव्हा येणार हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आतातरी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे व हात नियमित धुणे हि त्रिसूत्रीच यावरील उपाय आहे. उपचारांपेक्षा त्यापासून दूर राहणे हे केव्हाही चांगले आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेचा आरोग्याचा डाटा तयार होत आहे. यामाध्यमातून राज्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरावर नियंत्रण मिळवता येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या मोहिमेत आशा वर्कर चांगल्या पद्धतीने काम करत असून त्यांना आपण दररोज १५० रु मानधन देत आहोत. जर हे मानधन आपण ३०० रु केले तर निश्चितच आशा वर्कर यापेक्षाही चांगलं काम करून हे अभियान यशस्वी करतील अशी मागणी ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली.