शिक्षण क्षेत्राला दिली कृतीशीलता व व्यवहारिकतेची जोड
अकोला जिल्ह्याच्या व शिक्षणक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
व- हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागा करत त्यांच्या मधील क्षमता विकसित करून एक सुजाण भावी नागरिक घडविण्यासाठी झटणाऱ्या अकोला जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांना
भारत सरकारच्या नियोजन व प्रशासन संस्था दिल्ली मार्फत शैक्षणिक कल्पना व चांगल्या पद्धतीसाठी देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील २०१९-२० चा हा पुरस्कार दि.१० फेब्रुवारी २०२२ ला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते ऑनलाईन देण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी परभणी व यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करून शिक्षणक्रांती घडवली होती.
केवळ पुस्तकी ज्ञानाला व शिक्षणपद्धतीला बाजूला सारत व फाटा देत त्यांनी अकोला जिल्ह्यामध्ये व त्याचप्रमाणे यवतमाळ व परभणी जिल्ह्यामध्ये कृतिशील अध्यापन पद्धतीचा उपयोग शिक्षकांनी करावा यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शाळांना भेटी दिल्या, शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात या सुप्त गुणांचा शोध शिक्षकांनी घेऊन त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव द्यावे जेणेकरून मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन ते व्यवहारामध्ये ते करू शकतील याविषयी त्या नेहमी आग्रही असतात.
सर्जनशीलता, चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन कृतीयुक्त अध्यापनातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग (उपयोजन) त्यांनी व्यावहारिक जीवनात करावे हा मूळ हेतू अकोला माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुचिता पाटेकर मॅडम यांचा आहे.केवळ विज्ञान विषयच विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिकविता येतो असे नव्हे तर त्याचप्रमाणे भाषा , गणित, इतिहास , भूगोल यासारखे विषय सुद्धा शिक्षकांनी कृतीयुक्त अध्यापनातून व क्षेत्रभेटीतुन शिकवावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा प्रत्येक संबोध व कल्पना निरीक्षणातून स्पष्ट होतील याविषयी त्या नेहमी आग्रही असतात.
प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थी , पालक व शिक्षक यांच्या सतत संपर्कात राहून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत त्या गुणवत्ता विकासासाठी सतत झटत असतात.सातत्याने शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याची पावती म्हणूनच भारत सरकारच्या नियोजन व प्रशासन संस्था दिल्ली मार्फत शैक्षणिक कल्पना व चांगल्या पद्धतीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी झालेल्या त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.