वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
🚩राजमाता जिजाऊसाहेब यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🚩
राजमाता जिजाऊंचा जन्म पाऊस शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर सूर्योदय समयी दिनांक १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. सिंदखेडच्या राजवाड्यात लखुजीराजे आणि म्हाळसाबाई राणीसाहेब यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊसाहेबांचा जन्म मातब्बर मनसबदार अशा लखुजीराजे जाधवराव यांच्या पोटी झाला होता.
लखुजीराजे व आई म्हाळसाबाई राणीसाहेब यांच्या सहवासात शौर्याच्या कहाण्या ऐकत जिजाऊंचे बालपण मजेत गेले होते.लखोजीराजांचा चौसोपी वाडा, सरंजाम ,नोकरचाकर ,हत्ती-घोडे, चित्तथरारक कवायती ,संगीत शाळा, नगारखाने इत्यादी गोष्टी जिजाऊंच्या बालमनावर निश्चितच संस्कार करून गेल्या .राजवाड्यात आपले गार्हाने घेऊन येणारे लोक मुत्सद्दी व पराक्रमी लोकांची वर्दळ ,लढायांचे डावपेच विविध विषयांची चर्चा या सर्व गोष्टीला न्यायबुद्धीने उत्तर देण्याची लखुजीराजे यांची हातोटी इत्यादी गोष्टी जिजाऊंच्या बालमनावर नक्कीच चांगले संस्कार करून गेल्या.
अशा संस्कारक्षम घराण्यातील जिजाऊसाहेब भोसले यांच्या घरात आल्या नंतर आपल्या मुलाला अतिशय चांगले संस्कार करत गेल्या. शिवाजीराजांना प्रत्येक वेळी यशच का मिळत गेले ? असा प्रश्न पुष्कळवेळा आपणापुढे उभा राहतो, याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे उत्तम असे नेतृत्व. खुद्द शिवाजीराजांच्या अंगी धडाडी, सारासार विचार, शौर्य आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे लोकांच्या गुणांची पारख करणे हा होता. शिवाजीराजांनी केवळ या गुणावरच घोडखिंड पावन करणारे शंभूसिंह जाधवराव ,बाजी व फुलाजी बांदल यासारखे शूर योद्धे मिळवले होते. पुरंदरला शीर तुटून खाली पडलेले असतानाही शत्रूची मुंडकी उडविणारे मुरारबाजी लाभले होते. त्याचप्रमाणे अफजलखान भेटीच्या वेळी शिवाजीराजांचे संकट ते आपले संकट म्हणून तेथे जवळच उभे राहणारे जिवाजी ही काही कमी नव्हते.
‘आधी लगीन कोंढाण्याचे ‘ सांगणार्या आणि लगेच स्वराज्यात कोंढाणा किल्ला सामील करून आत्मबलिदान करणारे तानाजी मालुसरे हे देखील कोठेही उणे नव्हते हे त्यांनीच दाखवून दिले होते. चारी पादशाहींनी हाय खाऊन कित्येक वेळा ज्याच्या हातून माती खाल्ली व प्रतिशिवाजी म्हणवून घेतले ते नेताजी पालकर म्हणजे तर साक्षात विजांचा कडकडाट होते. याशिवाय प्रतापराव गुजर,अण्णाजी दत्तो, रघुनाथराव ,मोरोपंत पिंगळे असी अनेक माणसे शिवाजीराजांनी वेचून काढली होती. फक्त निवडली असे नव्हे तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यावर कामगिरी शिवाजीराजांनी सोपवली होती.
शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी शिवाजीराजांना घडविले. महाराष्ट्राला मुस्लीम जोखडातून स्वतंत्र करावयाचे विचार त्यांच्यात जागृत केले. जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या माऊलीने जोपासला व अतुलनीय धैर्याचा परिचय देऊन कार्य सिद्धीला पोहोचविले. अफजलखान नावाचे भयंकर संकट आले तरी जिजाऊमातेने मोलाची सल्लामसलत करून आशीर्वाद दिला .’ यश देईल भवानी, तुम्ही कामगिरीला सिध्द व्हा.’
‘वाघाएवढे काळीज लागते ,पोटच्या गोळ्याला मृत्यूसमोर उभं करायला पण धाडस लागते.
जिजाऊंना ध्यास लागला होता तो स्वराज्य स्थापनेचा.
इ.स.१६६६ ला घात करणारे संकट ओढवले.औरंगजेब बादशहाला आग्र्याला जाऊन भेटायचे होते. पण याहीवेळी मातेने पुत्राला हिंम्मत दिली. युक्तीचा सल्ला दिला व आशीर्वादही दिला. ही कामगिरीही पार पडेल, आई भवानी राहील तुमच्या पाठीशी.
मार्च ते सप्टेंबर असा सहा महिने जिजामातेने चोखपणे राज्याचा कारभार पाहिला .शत्रूच्या हाती एकही किल्ला दिला नाही ; उलट शत्रूच्या ताब्यातील ‘ रांगणा किल्ला ‘ स्वराज्यात सामील करायचे राजकारण केले. स्वतंत्र विचारसरणी व कर्तृत्वाची जाण जिजाऊ मातेमध्ये सक्षम होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याच्या कारभारामध्ये अधिकाधिक लक्ष घातले.छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल जिजाऊंना अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा वाटत असला तरी त्या कधी पुत्रप्रेमाने आंधळ्या होऊन राजांना कधी कोणत्या सवलती देत नसत. उलट त्यांची करडी नजर सर्वांच्यावर होती.
गुणांची पारख कशी करावी, लोकसंग्रह कसा करावा, केलेला लोकसंग्रह कसा टिकवावा हे जिजाऊंनी शिवाजीराजांना शिकवले होते. शिवाजीराजांनी मुसलमानांचा ही विश्वास संपादन केला होता. राजांच्या सैन्यात कितीतरी पठाण मुसलमान होते. त्यांना नोकरीवर ठेवून योग्य मोबदला दिला होता.
शिवाजीराजे म्हटले की , मोगली आणि आदिलशाही दोन्ही तख्ते रागाने दात-ओठ खात .प्रत्येक जण आपापल्या परीने शिवाजीराजांना पकडून देऊ पाहत होते. पण ते त्यांना जमले नाही .मरणासारखी संकटे समोर उभी होती, तरीदेखील तम्ही शरण जावा आणि आपली सुटका करून घ्या असे जिजाऊ त्यांना कधीच सांगत नसत.
जिजाऊंनी आपले स्वतःचेच मन इतके घट्ट केले होते की कोणत्याही संकटप्रसंगी मोठ्या धीराने त्या मार्गदर्शन करीत.माँसाहेबांमुळेच शिवाजीराजे हे पन्हाळ्यावर स्वराज्याच्या दृष्टीने निर्धास्त होते. कारण राजगडावरून स्वतः जिजाऊ जातीने सर्व पाहत होत्या. कोंढाणा किल्ला घ्यायला लावणाऱ्या जिजाऊ साहेब अत्यंत विचारी व दुरदर्शी होत्या. जिजाऊंचे व्यवहारचातुर्य एवढे आघात होते की केवळ त्यांच्याच प्रेरणेने , शिकवणीमुळे शहाजी राजांच्या गैरहजेरीत देखील प्रत्येक गोष्टी त्यांनी शिवाजीराजांकरवी करून घेतल्या ,यातच त्यांची मुत्सद्देगिरी पारखण्यासारखी होती.
वास्तविक शिवाजीराजांच्या जीवनात शहाजीराजांचा संपर्क किंवा सानिध्य खूपच कमी होते ; परंतु आऊसाहेबांनी आईची जागा भरून काढलीच परंतु त्याशिवाय वडिलांची भूमिका सुद्धा कित्येक वेळा त्यांना करावी लागली. कारण शहाजीराजांच्या आयुष्यातील बहुतेक वेळ स्वारीवर व दगदगीत दक्षिणेकडे गेल्यामुळे प्रत्यक्ष शिवाजीराजांकडे लक्ष देणे त्यांना कधी जमलेच नाही.
शहाजीराजे जरी फार काळ शिवाजीराजांजवळ नव्हते तरी आपल्या पित्या बद्दल त्यांना खूपच आदर होता.कारण जिजाऊंनी आपल्या वडिलांबद्दल कसे वागावे याचे खुप चांगले संस्कार केले होते.
महाभारतामध्ये पांडवांना निरनिराळ्या संकटकाळी भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, तर शिवशाहीमध्ये तसेच मार्गदर्शन जिजाऊंनी केले .
स्वराज्यस्थापनेच्या काळी जिजाऊंनी सर्वतोपरी कंबर कसली होती. त्यामुळेच शहाजीराजांच्या मृत्युने सती जाण्यास जेंव्हा जिजाऊ निघाल्या तेव्हा शिवाजीराजे पूर्णपणे हादरून गेले होते. कारण त्यांना माहीत होते की जिजाऊ या स्वराज्याची देवता आहेत. शिवाजीराजांचे जिजाऊंशी वागणे हे अत्यंत आदरणीय व विनम्रतेचे होते. शिवाजीराजे आईसाहेबांच्या इच्छेविरुद्ध काहीही करत नसत. उलट राजे कोणतेही काम करताना आईना विचारून ,त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेत. कारण शिवाजीराजांच्या पहिल्या सल्लागार म्हणजे जिजाऊसाहेब होत्या.
शिवाजी राजांच्या गैरहजेरीत जिजाऊ जातीने राज्याचा डोलारा सांभाळीत.शिवाजीराजे स्वारीवर गेले की जनतेचा न्याय निवाडा जिजाऊ साहेबच करत असत.
लांबून लांबून लोक जिजाऊंना पाहण्यास, भेटण्यास ,नमस्कार करण्यास येत असत .प्रत्येकाची योग्य ती विचारपूस करून, प्रत्येकाच्या तक्रारीकडे त्या लक्ष देत.क्षात्रतेजाला अपरिहार्य असणारे युद्धकौशल्य त्यांनी शिवबांना शिकवले होते. लढाईचे प्रकार माहीत करून दिले होते. शत्रूशी दोन हात कधी करावेत व प्रसंग बिकट असेल तर गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम कसे करावे याचे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले होते.शक्तीची, बळाची लढाई केव्हा व बुद्धिचातुर्याची लढाई केव्हा करावी, याचे शिक्षणही जिजाऊ यांनी शिवबाला दिले होते.
क्षात्रतेजाने इतिहास निर्माण केलेल्या सातवाहन ,राष्ट्रकूट ,चालुक्य, वाकाटक व यादव घराण्यातील श्रेष्ठ आदर्श पुरुषांच्या पराक्रमाच्या व कर्तृत्वाच्या गोष्टी त्यांनी नेहमीच शिवबाला सांगितल्या. या थोर युगपुरुषांप्रमाणेच शिवाजीराजांनी आलौकिक कर्तुत्व करावे ,असे जिजाऊंना मनोमन वाटत होते. शिवाजीराजांना विरक्ती, वैराग्य व त्याग इत्यादींची शिकवण दिली. लोकांच्या सामर्थ्यावर मिळवलेले राज्य लोकांच्या कल्याणासाठीच चालविले पाहिजे,अशी जिजाऊंची धारणा होती. लोकांचे दुःख ओळखून प्रजा व राजा यांच्यात भावनिक ,वैचारिक, प्रेमाचे नाते असेल तर जीव्हाळा टिकून राज्यात सुव्यवस्था नांदते, असे जिजाऊंचे ठाम मत होते. रयतेचे रोजचे प्रश्न, समस्या त्यांच्या कुटुंबाची अवस्था, मुलाबाळांचे प्रश्न यावर राजाचे लक्ष असायला हवे ,असा जिजाऊंचा दंडक होता. शिवाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यास जिजाऊनी सुरुवात केली होती .त्यांना आपल्या मांडीवर बसवूनच राजकारण लोकसंघटन, संरक्षण, प्रशासन ,नीतिमूल्ये आदींचे डोळस ज्ञान दिले. यातूनच खर्या अर्थाने शिवाजीराजांची जडणघडण झाली होती .
जिजाऊ म्हणत, ” शिवबा ! तुमचे आजोबा मालोजीराजे ,लखुजीराजे अत्यंत पराक्रमी होते .वडील शहाजीराजे तर आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीवरती दरारा असणारे पराक्रमी सिंहच ! अशा सिंहाचा तुम्ही पुत्र आहात. शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे. दैववाद, कर्मकांड ,अनिष्ट रूढी परंपरा यांच्यामुळेच आदिलशाही, निजामशाही ,मुघलशाहीचे फावले आहे .सैन्यबळ ,दुर्गबळ, द्रव्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजीमहाराज ! भोसले – जाधव घराण्याचा पराक्रमाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे .तुम्हाला रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे आहे.शिवबा,मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी आहे, अशी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली.
इतिहास बदलणे जिजाऊंच्या हाती नव्हते ; परंतु नवा इतिहास घडविणे जिजाऊंना शक्य वाटले. स्वराज्य स्थापनेचे कार्य एकटे शिवबा करू शकणार नाहीत .त्यासाठी त्यांनी शिवबासोबत त्यांच्या इतर सहकारी मावळ्यांना ही घडविले .
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वातंत्र्याचा ,सुख – समृद्धीचा आणि भविष्याचा विचार जिजाऊंच्या स्वराज्य कल्पनेत होता. जिजाऊ या शिवाजीराजांची माताच नव्हत्या तर सर्वांची त्या प्रेरक शक्ती होत्या. जिजाऊंनी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिल्याने शिवरायांची मजबूत जडणघडण झाली होती.
🙏अशा या थोर व शोर्यशाली राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏
लेखन ✒️
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर