मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : समाजातील उपेक्षित घटकांसाठी सातत्यपूर्ण पद्धतीने व माध्यमांच्या झगमगाटापासून दूर राहून काम करणाऱ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींचा यथायोग्य सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही शंभूराजे फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहोत.जिल्ह्यांत विविध क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न घेता या सर्व सावित्री जिजाऊंच्या लेकींनी त्यांच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप द्यावी व शंभूराजे फाउंडेशनने अशा सर्व संघर्षाचा सोहळा करावा या हेतूने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त माईचा सन्मान करण्याचे योजिले असल्याची माहिती फाउंडेशनच्या सचिव सौ.कविता मिटकरी यांनी दिली.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात सामाजिक अंतर राखीत आयोजित या पत्रकार परिषदेत आमदार अमोल मिटकरी, दीपाली बाहेकर आदी उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या वीरांगनाचा सत्कार सोहळा 12 जानेवारी 2022 रोजी 4.00 वाजता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कमिटी हॉल या ठिकाणी होत असून यात जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेल्हारा सारख्या अत्यंत दुर्गम भागांमध्ये शेती क्षेत्रात काम करणारी नासरी चव्हाण ते संपूर्ण जिल्हाभर राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या प्रतिभा अवचार या सर्वांचा सत्कार करणार आहे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना आपलेपणाने काळजी घेणारी सिस्टर ग्रेसी मरियम व वारकरी संप्रदायाची शिकवण लोकांपर्यंत पोहचविनारी किशोरीताई या सुद्धा सत्कारमूर्ती आहेत.शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब कष्टकरी कुटुंबांना आहे तिथेच आपली हक्काची जागा मिळावी यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या नीलु ताई असो की होमगार्ड ताई म्हणून काम करणारी शहनाज ताई त्यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाचे मोरपिस शंभूराजे फाउंडेशन फिरवणारआहे. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे काम प्रांजली ताई आणि मेघा ताई करतच आहेत त्यांचासुद्धा यानिमित्ताने सत्कार म्हणजेच समाजातील खऱ्या हिरोंचा सत्कार आहे. अकोटच्या खडतर रस्त्यांनी प्रवास करताना सोयरे ताईंचे सोयरपन घेतल्याशिवाय समोर जाता येत नाही कारण कठीण परिस्थितीतही त्यांनी तत्वाशी तडजोड केली नाही अशा तत्वनिष्ठ माईंचा सत्कार करून समाजातील नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे हाच शंभूराजे फाउंडेशन चा या कार्यक्रम मागील उद्देश आहे. या सोहळ्यात मातृशक्तींनी 12 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कमिटी हॉल येथे कोविड नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.