वाईनला अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात आणा; किसान ब्रिगेडची मागणी
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : दारु दुकानावरील वाईन ही अक्षरे हटवून त्याऐवजी लिकर शॉप लिहावे,तसेच वाईनला अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात आणावे, अशी मागणी किसान बिग्रेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठवल्याचे सांगितले. किसान ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी अकोल्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
खरे तर वाईन हे संपूर्णपणे कृषी उत्पादन आहे. फळांचा शुध्द केलेला बाटलीबंद उत्कष्ट रस, याशिवाय वाईनची दुसरी व्याख्याच करता येत नाही. वाईन हे खरे तर हेल्थ ड्रिंक आहे. मात्र, दारू विकणाऱ्या दुकानांना लिकर शॉप ऐवजी शब्दच्छल करीत वाईन शॉप असे गोंडस नाव दिल्यामुळे वाईन बद्दल समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. समाजात दारूला प्रतिष्ठा नसल्याने दारू निषिद्ध आहे. त्यामुळे इंग्रज काळात भारतामध्ये दारूची दुकाने लावण्याकरिता ’वाईन शॉप’ ही शक्कल इंग्रजांनी काढली आणि त्या नावाने देशभर दारू दुकाने सुरू झाली, ती स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये सुध्दा अजूनही अबकारीखात्या अंतर्गतच सुरू आहेत. या वाईन शॉप नाव असलेल्या दुकानांमधून झालेल्या ’वाईन आणि लिकर’ यांच्या विक्रीवर एक नजर टाकली तर दिसेल की वाईनची विक्री ही लिकर म्हणजे दारूच्या तुलनेत १% सुद्धा नाही, ही एकच बाब वस्तुस्थिती स्पष्ट करते. जगात अनेक देशांत, एवढेच कश्याला केरळ मधील कुर्ग ह्या जिल्ह्यात घरोघरी सुग्रण गृहिणी विविध फळांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास १५० प्रकारच्या वाईन बनवतात, ज्यात जांभूळ, डाळिंब, पेरू, गाजर, काकडी, मुळा, केळी, मोसंबी, संत्रा, चिकू, सीताफळ, महुवा, टोमॅटो, सफरचंद, अंगुर, किवी, आंबा, मिरची, स्ट्रॉबेरी, लिची,फणस,ड्रॅगन फ्रुट, कोकम इत्यादीं बहुतेक फळांच्या वाईनचा समावेश होतो. त्यामुळे कुर्गला वाईन डिस्ट्रिक्ट ही ओळख प्राप्त झाली आहे. भारतात गोवा व केरळ वगळता इतरत्र मात्र “वाईन शॉपच्या” आवरणाखाली लिकर म्हणजे चक्क दारू विकण्याच्या या धोरणामुळे वाईन संदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. भारतात वाईन हे पेय अबकारी विभागाअंतर्गत असल्यामुळे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांवर “लायसन्स परमिट” राज अंतर्गत अनेक बंधने आल्यामुळे आणि जबर फी व अबकारी कर आकारणी मुळे या कृषिआधारीत उद्योेगाच्या विकासाचा संकोच झाला आहे. आज देशभर फळांचे विपुल उत्पादन होते आहे, मात्र जाचक अटींमुळे आणि गैरसमज असल्यामुळे या फळांवर आधारित उद्योेगात शिरण्यास शेतकरी धजावत नाहीत, परिणामी एकीकडे कृषीउत्पादन असलेली फळे वाया जाऊन शेतकरी नुकसानीत येऊन आत्महत्या करीत आहेत. वाईन संदर्भातील इंग्रज कालीन धोरण बदलून दारू दुकानांवरची ‘वाईन’ ही अक्षरे हटवून त्यावर “लिकर शॉप” असे लिहिण्याची सक्ती करावी , तसेच ’वाईन’ ला कृषी उत्पादनाचा दर्जा व विविध सवलती आणि अनुदाने देऊन वाईन उद्योेग हा खादी ग्रामोद्योगा अंतर्गत कुटिरोद्योग म्हणून भरभराटीला आणावा आणि शेतकरी समृद्ध करावा. यासाठी नियमात बदल करून ’वाईन’ला अॅग्री हेल्थ ड्रिंकचा दर्जा देण्यात यावा, अशी किसान ब्रिगेडची मागणी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
वाईनच्या नशिबीच वनवास का?
एकीकडे प्रकृतीला अत्यंत हानिकारक टॉयलेट साफ करण्याच्या लायकीची अनेक शीतपेये बाजारात खुलेआमपणे प्रतिष्ठेच्या नावाखाली विकल्या जात असतांना शुद्ध कृषी उत्पादन असलेल्या आरोग्यवर्धक वाईनच्या नशिबी मात्र असा वनवास का? असा सवालही प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे साखरेच्या औद्योेगिक मळीपासून तयार केलेली आणि फळांचा दुरुनही संबंध नसलेली आणि आरोग्यास अत्यंत घातक अशी दारू मात्र चक्क ‘संत्रा’, ‘मोसंबी’ ‘नारिंगी’ या नावाने शासनाच्या आशीर्वादाने खुलेआम विकल्या जात असल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे. दरम्यान हेल्थ ड्रिंक असलेल्या वाईन संदर्भात प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी अनेक मान्यवरांचे दाखले तसेच जगातील विविध देशातील परिस्थिती काय आहे, हे आपण तपासून पाहू शकता असेही पोहरे म्हणाले.
शेतकऱ्यांचे व्यापक हीत जोपासणे आवश्यक
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताकरिता विशेषता फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या व्यापक हिताकरिता हे करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण याकरिता विशेष प्रयत्न करून किंवा अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी दारू दुकान वरील वाईन ही अक्षरे काढण्याकरिता या पुरोगामी राज्याचे पुरोगामी मुख्यमंत्री, या प्रगतिशील देशाचे पंतप्रधान म्हणून पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
Box
दारु दुकानावरील वाईन हे नाव न हटविल्यास आंदोलन
वाईनला कृषी उद्योगाचा दर्जा देण्यासाठी किसान ब्रिगेडच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केल्या जाणार आहे, त्याअंतर्गत लवकरच अनेक जिल्ह्यात वाईन क्लब स्थापन करून वाईन फेस्टिव्हल आयोजित केल्या जाणार आहेत. नागपूर येथे शरद फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर वाईन क्लब मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी नुकतेच 4 व 5 डिसेंबर असे 2 दिवस आठवा वाइन फेस्टिव्हल साजरा केला, ज्याला समाजातील सर्वच स्तरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित स्त्री पुरुषांनी कुटूंबियांसोबत भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे वाईन संदर्भात प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर दारू दुकानावरील वाईन या नावावर काळा रंग मारण्याचे आंदोलन लवकरच छेडण्यात येईल , ज्यामुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन देश तथा राज्याला शेतकरी रोष्यास सामोरे जावे लागेल, ज्याची जबाबदारी सरकारवर राहील असा इशाराही पोहरे यांनी दिला आहे. आवश्यक असल्यास यासंदर्भात अधिक व्यापक चर्चा करण्याकरिता तज्ज्ञांना आणि समाजसुधारक लोकांना सोबत घेऊन किसान ब्रिगेडने मंत्रालयात सरकार सोबत बैठक घेण्याची तयारी दाखवली आहे.