कृषि विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ थाटात!
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: नव्या व सामर्थ्यशील भारताचे निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर, संशोधकांनी योगदान द्यावे,अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणा-या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी,असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती कृषि विदयापीठ मा. भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ आज संकरीत पद्धतीने (प्रत्यक्ष तथा अभासी ) कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात अत्यंत शिस्तीत पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, 1960 च्या सुमारास आपला देश आयात अन्नधान्यावर अवलंबून होता. आज आपण अन्नधान्य उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण आहोत. याचे श्रेय कृषी संशोधक व शेतकऱ्यांना आहे. देशात हरित क्रांती झाली. नंतर श्वेत क्रांती झाली आता आपले पंतप्रधान नील क्रांती करण्याची धोरणे आखत आहेत. आपल्या देशात अन्नधान्य उत्पादन विपुल होत असले तरी ते पोषणमूल्याने परिपूर्ण असावे यासाठी अधिक संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपली कृषी उत्पादने अधिक दर्जेदार असावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नवा व समर्थ भारत घडविण्यासाठी संशोधकांनी ,युवक युवतींनी पुढे यावे, सुंदर भारत व सुंदर विदर्भ हेच युवक घडवू शकतात, अशा शब्दात त्यांनी युवा शक्तीवर आपला विश्वासही व्यक्त केला. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण (अभासी पद्धतीने) यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले, विदयापीठ कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम एल मदन (अभासी पद्धतीने), डॉ.शरदराव निंबाळकर, डॉ. व्यंकटराव मायंदे (अभासी पद्धतीने), विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य तथा सदस्य विधान परिषद आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्मानीय इतर सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, माजी कार्यकारी परिषद सदस्य गणेश कंडारकर, विनायक सरनाईक व विद्यापीठ विद्या परिषद सदस्य उपस्थित होते. कुलपती तथा राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांच्या अनुमतीने पदवीदान सोहळ्यास सुरुवात करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत गायन झाले. त्यानंतर सरस्वती वंदना होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकपर भाषण करुन विद्यापीठाचा कार्य अहवाल सादर केला. त्यानंतर प्रति कुलपती मा.ना. श्री. दादाजी भुसे तथा इतर मान्यवरांचे शुभ हस्ते विधीवत पदवीदान व पारितोषिक वितरण पार पडले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करतांना विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल कौतूक केले. विद्यार्थ्यांचे तसेच नव संशोधकांचेही त्यांनी कौतुक केले. आपले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे व सुलभ असावे. तसेच संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या विद्यापीठांचे बहुमोल योगदान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योती हातेकर यांनी केले कार्यक्रमात इंद्रधनुष्य मेलोडी ग्रुपच्या कलावंतांनी विद्यापीठ गीत, सरस्वती वंदना व पसायदान सादर केले.
3359 स्नातकांना पदव्या प्रदान
राष्ट्रगीताने प्रारंभ झालेल्या या दीक्षांत समारंभात एकूण 3359 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या, यामध्ये बी.एस्सी (कृषि) 2489, उद्यान विद्या 187, वन विद्या 28, कृषि जैव तंत्रज्ञान 111, कृषि व्यवसाय व्यवस्थापन 70, बी. एस्सी. अन्नशास्त्र 81, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) 89, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) 218, उद्यान विद्या 31, वनविद्या 02, कृषि अभियांत्रिकी 07, एम. बी. ए (कृषि) 19, पीएच.डी 27 आदीचा समावेश आहे. उपरोक्त 1258 स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात 24 आचार्य पदविधारक स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारली व उर्वरित 1234 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील. 27 जणांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉपीची पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठांमधील शिक्षण त्याचा संशोधन कार्यामध्ये आपले उत्कृष्ट योगदान देणा-या शिक्षक तथा संशोधकांना विविध पदके तथा पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट कार्य करणा-या कर्मचा-यांचा ही गौरव करण्यात आला.