श्री शिवाजी विद्यालय अमृत महोत्सव उद् घाटन व सहकारमहर्षी अण्णासाहेब कोरपे विचारमंच नामकरण सोहळा 14 ऑक्टोबरला
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन भाऊसाहेबांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवुन शाळा उघडल्या. त्यांनी खडतर प्रयत्नाने चेतवलेला ज्ञानयज्ञ निरंतर तेवत ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर यांनी केले.
श्री.शिवाजी विद्यालय मुख्य शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिक्षण व कृषी क्षेत्रात भाऊसाहेबांनी अफाट कार्य केले.जागतिक दर्जाची कृषी प्रदर्शन दिल्लीला भरवुन अवघ्या जगाचे लक्ष वेधुन घेतले.कष्टकरी समाजाला अज्ञान —अंधश्रद्धेच्या गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी जनजागृती केली.त्यांचे कार्याला—कतृत्वाला विविध कार्यक्रमाने अभिवादन करणार असल्याची माहिती श्री केशवराव मेतकर यांनी दिली.
शाळा समिती सदस्य विलासराव हरणे यांनी शाळे च्या स्थापनेपासुनचा विकासआलेख मांडला.त्याचबरोबर कष्टकरी —शेतकर्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणुन काॅन्व्हेंटची स्थापना केल्याचे प्रतिपादन केले.दि.१४आॅक्टोबरला सकाळी १० वाजता अमृतमहोत्सवी सोहळ्याचे उद् घाटन व सहकारमहर्षी अण्णासाहेब कोरपे विचारपीठ नामकरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी केले. मुख्याध्यापक दिवाकर वानखडे, व्ही.पी. गावंडे, अंजुताई बोंडे,पराग ठाकरे, बबनराव कानकिरड, डाॅ.सौ.भामोदे, एम बी लांडे यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.