व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय कन्यादिन देशभरात साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून गुरूवार, 30 सप्टेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील कस्तुरबा हॉल येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वंदना पटोकार (वसो) व वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कन्यादिन उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार आणि प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे आणि ए.एस.पी. रितू खोकर हे उपस्थित होते. डॉ.वंदना पटोकार (वसो) यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती देणारे पथनाट्य सादर केले तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे पात्र रंगवून स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुली झालेल्या 51 मातांचा बेबी कीट (स्वेटर) व अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.संजय खडसे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक केले. त्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी मनपा क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या पीसीपीएनडीटी कार्यक्रमाबाबत माहिती देतानाच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सूचित केल्यानुसार सोनोग्राफी केद्रांची तपासणी सुरु करण्यात आल्याचे सांगितले.
मुलींनी उच्च शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहावे: आयपीएस रितू खोकर
आयपीएस रितू खोकर यांनी मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे व समाजात वावरताना मनात कसलीही भीती न ठेवता निर्भिडपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे सांगितले. सौरभ कटियार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे व पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक केले तसेच अशाप्रकारे बेटी बचाओबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम दरमहा आयोजित करण्यात यावेत, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ.विजया पवनीकर, डॉ. अर्चना फडके, डॉ.मीना शिवाल, डॉ. नारायण साधवानी, सौ सीमा बेंद्रे, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. संचालन मनिषा बंड यांनी तर आभार प्रदर्शन नम्रता हुमणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वेणू डोंगरे, सुवर्णा जोशी, सावित्री चाटे, सुदाम भिंगारे, कपिल सिरसाट, सय्यद आरीफ आदिंचे सहकार्य लाभले.