प्रशांत खंडारे @ वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नैसर्गिक आपत्ती कोणतीही असली तरी, आपत्तीचा सामना करणे अत्यावश्यक आहे. ओढवलेल्या संकटाचा सामना करणे आपल्याच हाती असते. संभाव्य आपत्तीसाठी “आपत्ती व्यवस्थापन” सज्ज असले तरी, काही “अतिउत्साही” पूरग्रस्त परिस्थितीला नजर अंदाज करून मृत्यू ओढवून घेतात. गेल्या सहा वर्षात पूरग्रस्त परिस्थितीत 30 जणांना जलसमाधी मिळाल्याचे विदारक वास्तव आहे.
अतिवृष्टी झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला.चार पाच व सहा सप्टेंबर रोजी बोरी आडगाव, टाकरखेड वायाळ, मकरध्वज खंडाळा, देऊळगाव कुंडपाळ येथे वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चार जणांना वेगवेगळ्या कारणाने जलसमाधी मिळाली.आशूतोष सुरवाडे, राजेश सपकाळ, दत्तू बिथरे, शंकर सरोदे अशी यांची नावे आहेत.बुलडाणा शहरातील येळगाव धरणात बेपत्ता असलेला सुरज सुभाष भोसले पाण्यावर तरंगताना आढळून आला. नांद्राकोळी येथील दोन जण वाहून गेले.. एक बेपत्ता आहे तर एक सुखरूप सापडला. पूरग्रस्त परिस्थितीत सावधगिरी पाळणे गरजेचे असताना, काहींचा अतिउत्साहीपणामुळे तर काहींचा दुर्दैवीपणामुळे पाण्यात बुडून मृत्यू होतो.जिल्ह्यातील नदीकाठच्या 86 गावांना पुराचा धोका असतो.235 गावे संभाव्य पूर बाधित गावे म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. मोठ्या नद्यांमुळे 86 तर लहान नद्यांमुळे 11 गावे बाधित होतात. एवढेच नव्हे तर नद्या-नाल्यांमुळे 149 गावे बाधित होण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास 1,70,00 लोकसंख्येला बाधा निर्माण होऊ शकते. गेल्या 6 वर्षांमध्ये जिल्ह्यात 30 जनांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. सन 2014 व 2017 वगळता 2015 मध्ये 3, 2016 मध्ये 2, 2018 मध्ये 1, 2019 मध्ये 6, सन 2020 मध्ये 12 तर यावर्षी 2021 मध्ये आज पर्यंत 6 जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची शासन दरबारी नोंद आहे.परंतु शासनाच्या निकषांमध्ये बसले तरच, मृतकाच्या वारसांना तोकडी मदत मिळते.