व-हाड दूत न्यूज नेटवर्क
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा महागोंधळ
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांनुसार गट क व गट ड प्रवर्गातील जागांसाठी २५ व २६ सप्टेंबररोजी परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र परिक्षेच्या आधल्या रात्री ऐनवेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परिक्षा पुढे ढकलल्याचे सोशल मिडियातून जाहिर केले. आरोग्य विभागातील भरती परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल टोपे साहेबांनी माफी मागितली असली तरी या प्रकारास जेवढी दोषी न्यासा ही संस्था आहे, तेवढेच आरोग्य विभागाचे नियंत्रण अधिकारीही आहेत. कारण हे सर्व घडत असतांना नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणारे आरोग्य यंत्रणेचे अधिकारी काय झोपा काढत होते काय ? हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
स्वत: सक्षम नसल्याने महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून विविध विभागाच्या परिक्षा घेण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्थांची मदत घेत आहे. दिवसेंदिवस हा गोंधळ वाढतच चालला आहे. गेल्या महिन्यात जी चूक एमआयडीसी विभागाच्या परिक्षेची झाली. तीच चूक पुन्हा रिपीट झाली. एमआयडीसीची परिक्षा एकाच महिन्यात दोनदा पुढे ढकलण्यात आल्याने हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आणि यावेळेसही न्यासाच्या अकार्यक्षमतेमुळे आरोग्य विभागाची परिक्षा पुढे ढकलली. आश्यर्च हे की, सोशल मिडियावर आरोग्य विभागाच्या परिक्षेतील गोंधळ अनेकांनी मांडल्या नंतरही दिवसभर कोणतीही अॅक्शन यंत्रणेने वा मंत्री महोदयांनी घेतली नाही. मात्र नेमकी आज (२५ सप्टेंबर) परिक्षा आणि (२४ सप्टेंबर) ला मध्यरात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मिडियातून परिक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या परिक्षेसाठी दूरवरचे सेंटर असलेले अनेक विद्यार्थी आपल्या सेंटरवर परिक्षा देण्यासाठी बस, ट्रॅव्हल्सने निघाले सुद्धा होते.
टोपे यांनी या सर्वाचे खापर परीक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या न्यासा कम्युनिकेशनवर फोडले असले तरी परिक्षा नियंत्रक म्हणून काम पाहणारे आरोग्य विभागाचे जिल्हा, तालुका व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी काय झोपा काढत होते काय! असा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यासा कम्यूनिकेशनला जरी परिक्षेचे काम दिले असले तरी नियंत्रण अधिकारी म्हणून आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी काय चौकशी केली. हा प्रश्न आहे.
साभार:
योगेश फरपट
जिल्हा प्रतिनिधी, नवराष्ट्र अकोला
मो.क्र. 09764181234
ई-मेल. yogesh.farpat@gmail.com