स्वच्छता ही सेवा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज जिल्हाभरात स्वच्छतेसाठी हजारो हातांनी श्रमदान करून ग्रामपंचायत परिसर , शासकीय कार्यालय, रस्ते स्वच्छ करीत या उपक्रमात सहभाग घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी कापशी रोड येथे भेट देऊन एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमात दर आठवड्याला ग्रामस्वच्छता करण्यासाठी राबणा-या महिलांशी संवाद साधत या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी महिला, ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली व वृक्षारोपण केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, अकोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल शेळके, ग्रामपंचायतीचे सरपंच अंबादास उमाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी कापशी रोड येथील सार्वजनिक शौचालय, गोबरधन प्रकल्पाची नियोजित जागा, गाव हागणदारीमुक्त अधिक (ओ डी एफ प्लस) घोषित करण्यासाठी आवश्यक निकषांमध्ये असणाऱ्या स्वच्छतेचे संदेश-म्हणी, ग्रामपंचायतीने तयार केलेली वैयक्तिक शोष खड्डे ची प्रतिकृती (मॉडेल) यांची सुद्धा पाहणी केली.
याप्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी कु. अनुपमा अब्दे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ कु. अर्चना डोंगरे, पाणी गुणवत्ता सल्लागार कु. ममता गनोदे, ग्रामसेवक योगेश देशमुख, समुह समन्वयक संतोष चतरकर आदी उपस्थित होते.