▪️ गळ्याने वाकविते चिमुकली त्रिशूल
▪️ दररोजची “कसरतच” शमविते कुटुंबांची भूक
प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रस्तोरस्ती हिंडून कसरती, हिमकती, कसब कौशल्याने लोकांची करमणूक करीत व त्यांच्याकडून मिळणाऱ्या बिदागीवर कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणाऱ्या चिमुकल्या बहिणी दिया आणि काजल सध्या शहरातील चौकाचौकात गरिबीचे दुष्टचक्र भेदताना दिसत आहेत.चिमुकलीची गळ्याने त्रिशूळ व लोखंडी सळई वाकविण्याची चित्तथरारक कसरत काळजाचा ठोका चुकवून जाते.
करोना महामारीतही आपल्या अंगभूत लवचिकतेच्या आधारे, विविध रोमांचक, चित्तथरारक, मनोवेधक कसरतीचे मिनी सर्कसच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करून आपल्या कुटुंबाची भूक शमविण्यासाठी भारतभर फिरस्ती करणारे कोसांबी अलाहाबाद उत्तर प्रदेशातील राठोड कुटुंबीय बुलडाणा शहरात डेरेदाखल झाले आहे. दिया आणि काजल या दोन बहिणी योगा व जिमनॅस्टिक मधील विवीध कलाबाजी तसेच गळयाने त्रिशूळ व लोखंडी सळई वाकवून बुलडाणेकरांचे वस्तीत तसेच चौका चौकात मनोरंजन करित आहेत. त्यांना ढोलकीवर दिलीप तर पियानोवर गोविंदा साथ देतात. तर राज अन रूपा या मिनी सर्कसचे सूत्रसंचालन करित असतात. मनुष्याची खरी क्षमता म्हणजे त्याचं मन आणि त्याची विचार करण्याची शक्ती, ज्या शक्तीला योग्य प्रकारे कार्यान्वित केलं गेलं तर ती शक्ती चमत्कार घडवू शकते. परंपरेने दिया व काजलला हेच शिकविल.साहसी कसरती, त्यांच्या खेळाचे स्वरूप आहे. जीवावार उदार होऊन, असे रस्त्यावरचे खेळ करणाऱ्या या लोकांचे पोट मात्र अगदीच हातावर असते. हा समाज सध्याही दुर्लक्षितच आहे, हे ही तेवढेच खरे!