व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: राज्यातील धुळे, नुंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या स्थगित केलेल्या पोटनिवडणुका पाच ऑक्टोबर रोजी होत आहेत. यामध्ये अकोला जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 28 गणांसाठी तसेच वाशीम जिल्हा परिषदेअंतर्गत ५२ पैकी १४ जि.प.गटांसाठी तर पंचायत समितीच्या १०४ पैकी २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. पाच ऑक्टोबरला मतदान व सहा ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश व कोविड परिस्थितीमुळे पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोविड संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे.
त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिका-यांकडून कोरोना रुग्णाची संख्या, आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागितला होता. अकोला जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने निवडणुक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 21 सप्टेबर रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपिल नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. अपिल असलेल्या ठिकाणी 29 सप्टेबर पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारांची यादी 21 सप्टेबर 2021 ला प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशपत्राबद्दल निवडणूक निर्णय अधिका-याच्या निर्णयाविरुद्ध न्यायाधिशांकडे 24 सप्टेबर ला अपिल करता येणार आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख 27 सप्टेबर 2021 असून अपिल निकालात काढल्यावर उमेदवारांची यादी प्रसिद्धीची तारीख 27 सप्टेबर राहणार आहे. अपिल नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेबरला सकाळी 11 ते 3 पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. अपिल असलेल्या ठिकाणी बुधवारी 29 सप्टेबरला सकाळी 11 ते तीनपर्यंत मागे घेता येईल. अपिल नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेबरला निशाणी वाटप होईल. अपिल असलेल्या ठिकाणी 29 सप्टेबरला निशाणी वाटप होईल. 5 ऑक्टोबरला निवडणुक तर 6 ऑक्टोबरला सकाळी 10 पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. विजयी उमेदवारांची नावे 8 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील.
या गट व गणांसाठी होत आहे निवडणूक
अकोला जिल्हा: 14 गट व 28 गणांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूर, अडगाव बु. तळेगाव बु, अकोट तालुक्यातील अकोलखेडा व कुटासा, मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी, बपोरी, अकोला तालुक्यातील घुसर, कुरणखेड, कानशिवणी, बाळापूर तालुक्यातील अंदुरा, देगाव, बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा, पातूर तालुक्यातील शिर्ला या जि.प.गटासाठी निवडणूक होत आहे. तर पंचायत समिती गणासाठी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, अकोट तालुक्यातील पिंप्री खु., अकोलखेड, मुंड़गाव, रौंदळा, मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, ब्रम्ही खुर्द, माना, कानडी, अकोला तालुक्यातील दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, बाळापूर तालुक्यातील निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, बार्शिटाकळी दगडपारवा, मो-हळ, महान, पुनोती बु. पातूर तालुक्यातील शिर्ला, खानापूर व आलेगाव गणासाठी निवडणूक होत आहे.
वाशीम जिल्हा: जिल्हा परिषदेच्या 14 जागा व पंचायत समितीच्या 27 जगासाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भामदेवी, कूपटा, तळप, फुलंब्री, कंजरा असेगाव, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, भर जहागीर उकळीपेन या जिल्हा परिषद सर्कलचा समावेश आहे. तर, पंचायत समिती गणांमध्ये भगवान उंबर्डाबाजार पोहा, धामणी खडी, कोडोली, धामणी, गिरोली शेंदुर्जना, वनोजा, कासोळा, सेनगाव, मरसुळ, जऊळका, जोडगव्हाण, शिरपूर, खंडाळा शिंदे, कवठा खुर्द, हराळ, वाकद, महागाव, फाळेगाव थेट, कळंबा महाली, उकळीपेन, पिंपळगाव या पंचायत समिती गणाचा समावेश आहे.