व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: सावत्र पित्याने दुष्कृत्य केल्याने गर्भधारणा झालेल्या पुणे येथील 17 वर्षीय मुलीची खामगावात प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना 13 सप्टेंबररोजी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे येथील विश्रांतवाडी भागात राहणा-या 17 वर्षीय मुलीवर घरी कुणी नसताना तिच्या सावत्र वडीलाने बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारेल अशी धमकीही दिली. यातून सदर मुलीला गर्भधारणा झाली मात्र तिने भीतीपोटी कुणाला सांगितले नाही. दरम्यान तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला एका रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता मुलगी साडेसात महिन्याची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मुलीला आईने विचारणा केली असता तिने सर्व हकीकत कथन केली.
अत्याचारग्रस्त मुलीचे नातेवाईक अकोला येथे असल्याने त्यांना भेटण्यासाठी पीडित मुलगी व तिची आई रेल्वेने निघाले मात्र वाटेतच मुलीचे पोट दुखत असल्याने त्या दोघी मायलेकी उतरल्या. अन दवाखान्यात जाण्यासाठी ऑटोने निघाल्या. दरम्यान वाटेत ऑटोतच सदर मुलीची प्रसुती झाली. याप्रकरणी मुलीच्या आईने खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी सावत्र वडिलांविरुद्ध कलम 376, 2 (एफ) (एन) सहकलम पोक्सो 4, 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे ठाणेदारांनी सांगितले.