वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान; उपाययोजना करा – किशोर तिवारी यांचे यंत्रणेला निर्देश

0
335

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम
: जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ९ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते आणि आर्थिक गणित कोलमडते. शेतपिकांचे नुसकान टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक असून जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयीचा कृती आराखडा वन विभागाने तयार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. यंदा खरीप हंगामात ९५ टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले असून जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची परिस्थिती चांगली आहे. मात्र, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळावे, त्यांना सावकाराच्या दारात जावे लागू नये, यासाठी बँकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे श्री. तिवारी यावेळी म्हणाले. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना होणारे अन्नधान्य वितरण व्यवस्थितपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सुद्धा विना अडथळा धान्य पुरवठा करावा. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य नियतन मंजूर करून होण्यासाठी पाठपुरवा करावा, असे श्री. तिवारी यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. या कुटुंबातील व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या वैद्यकीय संस्थांमध्ये पुरेसा औषधी साठा ठेवावा. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील सलंग्न खासगी रुग्णालयात येणाऱ्या पात्र रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य मित्रांनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावे, असे श्री. तिवारी यावेळी म्हणाले.
विषबाधेच्या घटनांबाबत नाराजी
जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच फवारणीमुळे विषबाधा झालेल्या व्यक्ती रुग्णालयामध्ये दाखल झाल्यास त्यांना योग्य औषधोपचार उपलब्ध करून द्यावा. अशा रुग्णांची नोंद ठेवावी. फवारणीचे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा कीट वापराबाबत व इतर आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे श्री. तिवारी यांनी यावेळी सांगितले. पीक कर्ज, अन्न सुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या, निराधार योजना अनुदान वाटप, आरोग्य सुविधा, खावटी योजना, कामगारांना अनुदान वाटप, सहकारी मजूर संस्थांचे ऑडीट, गौण खनिज वाहतूक आदी बाबींचा श्री. तिवारी यांनी यावेळी आढावा घेतला.

Previous articleपूर्णेला पूर; प्रवास टाळा- ठाणेदार सुरेंद्र राऊत यांचे आवाहन
Next articleमहाराष्ट्रातील 37 आयपीएस व 54 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here