व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कट्यार फाटा नजीक आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास कार व पिक अप च्या आमने-सामने झालेल्या एका भिषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये दोघे गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग – अकोला महामार्ग क्रमांक 200 वरील कट्यार फाटा नजीक अगदी थोड्या अंतरावर येत असलेल्या वळण मार्गावर दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपातापा कडून दहिहांडा कडे गॅस सिलेंडर घेऊन जात असलेली महिंद्रा पिक अप एम.एच.30 बि.डी. 0845 व म्हैसांग वरुन अकोलाकडे येत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. 38, 5727 या दोन्ही वाहनांची आमने-सामने झालेल्या जबरदस्त धडकेत महिंद्रा पिक अप चालक व कार चालक दोघेही जागीच ठार झाले असून कार मधील एक पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. तर पिक अप मधील एक जण किरकोळ जखमी झाला. या भिषण अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी 108 रुग्णवाहिका बोलाविण्यात आली होती. रुग्णवाहिका पोहचण्याआधी महिंद्रा पिक अप चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.