वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला:भारिपचे पहिले आमदार आणि मंत्री मखरामजी पवार यांचे दुख:द निधन झाले. त्यांचे सामाजिक व राजकीय महत्वपूर्ण राहिले आहे. बहुजन समाजाला जागृत करण्यासोबत संघटित करण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले.
शासकीय सेवेचा ३१ डिसेंबर १९८९ मध्ये राजीनामा देऊन फेब्रुवारी १९९० मध्ये ते भारिप (भारतीय रिपब्लिकन पक्ष) चे उमेदवार म्हणून निवडणूक लढून विजयी झाले. त्या निवडणुकीत आलेल्या राजकीय अनुभवातून पक्षाचे आमदार असलेले मखरामजी पवार ह्यांनी बहूजन समाजातील अल्पसंख्याक, दलित व आदिवासी ह्यांच्यासह बहुजन समाजातील सर्व जातींची एकसंघ राजकीय व सामाजिक शक्ती अकोला जिल्हयात उभी करण्यासाठी तत्कालीन खासदार बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे सोबत चर्चा करून आणि त्यांची सहमती घेऊन अकोला जिल्हा बहूजन समाज महासंघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.ज्यामध्ये भारीपचे पदाधिकारी लंकेश्वर गुरुजी, सूर्यभानजी ढोमणे, हरिदास भदे,प्राचार्य सुभाष पटनायक, बी आर सिरसाट, श्रीकृष्ण वानखडे ह्यांनी २३/८/१९९० रोजी बहूजन समाज महासंघाची स्थापना केली.त्यावेळी मखररामजी अकोल्याच्या मूर्तिजापूर मतदार संघाचे भारीपचे आमदार होते.
मंडल आयोगाचा मोर्चा
श्री. व्ही. पी. सिंगांच्या या मंडल अधिसूचनेमुळे त्यांचे लूटीचे क्षेत्र फक्त २७ टक्क्यांनी कमी झाले. आमच्या लुटीचे क्षेत्र का कमी केले म्हणून ही उच्चवर्गीय मंडळी आंदोलन पेटवत होती व तरूण मुलांना त्या आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करत होती. या प्रस्थापित मंडळींचे उच्चवर्णीय नखरे व मानभावी आक्रोश बंद करावयाचा असेल तर संपूर्ण बहुजन समाजाने जागृत व एक होऊन उच्चवर्णीयांच्या या आंदोलनाचा प्रतिकार केला पाहिजे असा निर्णय अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाने घेतला व बहुजन समाजाला मंडल आयोग समजावून सांगण्यासाठी, उच्चवर्णीयांच्या वर्णविद्वेषी बदमाशा, बहुजन समाजाला पटवून देण्यासाठी व मंडल आयोगाच्या तरतुदी बहुजन समाजाला पटवून देण्यासाठी व मंडल आयोगाच्या समर्थनार्थ बहुजन समाजाचे प्रती आंदोलन उभारण्यास बहुजन समाजाला उभे करण्यासाठी अकोला जिल्हाभर प्रचार दौरे काढण्याचे निश्चित करण्यात आले. मंडल आयोग. शिफारशीच्या समर्थनार्थ दिनांक ११-१०-१९९० रोजी अकोला येथे प्रचंड मोर्चा काढण्याचेही ठरविण्यात आले.
सामाजिक व राजकीय योगदान
अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची स्थापना झाल्यापासून ते दिनांक ११-१०-१९९० पर्यंत म्हणजेच मोर्चाच्या तारखेपर्यंत बहुजन समाज महासंघाच्या वतीने अकोला जिल्हाभर २-३ जीप्सू व २५-३० बहुजन समाजातील नेते मंडळीसह दौरे आयोजित करून २५० जाहीर सभा घेतल्या व संपूर्ण अकोला जिल्हा पिंजून काढला.भारिप व बहूजन समाज संघ असा संयुक्त मोर्चा मंडल आयोग लागू करण्याचा ऐतिहासिक मोर्चा ११-१०-१९९०संपन्न झाला.जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या निवेदनाचे प्रत पंतप्रधान व्ही. पी. सिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदराव पवार यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळामध्ये खासदार – बाळासाहेब आंबेडकर राज्यसभा सदस्य, आमदार- मखराम पवार, मूर्तिजापूर (अकोला जिल्हा) बी. आर. सिरसाट, अध्यक्ष, भारिप पक्ष, जि. अकोला. गणेशराव पाटील, बहुजन समाज महासंघसूर्यभान ढोमणे हरीदास भदे,प्रा. मधुकर पवार सहभागी होते.
अकोला पॅटर्न चा उदय
१९९२ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून त्यांचा दृष्य परिणाम समोर आला. भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी जवळ-जवळ १५ उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. २० जिल्हा परिषदेचे उमेदवार केवळ १०० ते २०० मतांच्या फरकाने पराभूत झाले. बहुजनातीलच ही लोकांची मामुली चूक झाल्यामुळे आमचे हे २० उमेदवार पराभूत झाले. अन्यथा अकोला जिल्हा परिषद भारतीय रिपब्लिकन व बहुजन समाज महासंघ पक्षाच्या ताब्यात राहिली असती. बहुजन समाज महासंघाचा एवढा जबरदस्त रेटा होता की भाजप व सेनेचे अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधे सर्व उमेदवार पराभूत झाले, त्यापैकी अनेकांच्या अनामत रक्क्मा जप्त झाल्या.
राजकीय कारकीर्द
बहुजन समाज महासंघाने दोन माजी आमदारांना चारी मुंड्या चीत केले तर एक माजी आमदार आमच्या आदिवासी उमेदवाराच्या सपाट्यातून आपल्या राजकीय बनवेगिरीच्या जोरावर कसाबसा थोडक्यात वाचला. अकोला जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आमच्या मुस्लिम उमेदवाराच्या दणक्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला व त्याला दारूण पराभव पत्करावा लागला. अकोला जिल्ह्यातील अनेक करोडपतींच्या विरुद्ध शेतमजुरवर्गातील उमेदवार उभे केले होते. पैशाचा प्रच्छन्न वापर करूनही त्या कोट्याधीश उमेदवारांना गरीब मजूर उमेदवाराकडून दारूण पराभव पत्करावा लागला.
अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितींच्या निवडणुकीमधे १२० उमेदवारांपैकी भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे ३० उमेदवार निवडून आले. आणि जवळ-जवळ ४८ उमेदवार मतांच्या अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले. अकोला जिल्ह्याच्या अकोला व बार्शी टाकळी या दोन्ही अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाने धनदांडग्या सत्तेच्या मक्तेदाराकडून हिसकावून घेतल्या. बार्शी टाकळी पंचायत समितीमधे बी. आर. शिरसाट हे बौद्ध सदस्य सभापती म्हणून काम करत आहेत. तर अकोला पंचायत समितीत धनगर सदस्य हरीदास भदे हे सभापती म्हणून झाले हाच पॅटर्न पुढे अकोला पॅटर्न म्हणून नावारूपाला आणला गेला.
या पार्श्वभूमीवर, उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा सर्वकष विचार करून त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, मंडल आयोगाने मागासवर्गीय म्हणून निश्चित केलेल्या बहुजन समाजातील २७२ जाती आणि अल्पसंख्यांक जाती यांची भक्कम एकजूट होणे ही काळाची गरज पाहता प्रत्येक समाजघटक हा मागासच असल्यामुळे आणि प्रत्येकाचे हितसंबंध जवळपास सारखेच असल्यामुळे ही एकजूट होणे अवघड नाही. सामाजिक व राजकीय एकजूटीअभावी यापैकी प्रत्येक समाजघटकाची प्रचंड हानी होत आहे व होणार आहे. जोपर्यंत करील सर्व समाजघटकांना विविध स्तरांवरील सत्तेमध्ये व प्रशासनामध्ये योग्य प्रमाणात सहभाग मिळत नाही. तोपर्यंत या मागास जाती जमातींवर योजनाबद्ध रीतीने लादण्यात आलेली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विषमता नष्टही होणार नाही व कमीही होणार नाही. आणि या जातीयवादी प्रवृत्तीना शहही बसणार नाही. ही विषमता खऱ्या अर्थाने नष्ट व्हायची असेल व या सर्व समाज घटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवायचे असतील व मूलतत्ववादी प्रवृत्तींना पायबंद घालावयाचा असेल तर वरील सर्व समाजघटकांचे एक व्यापक संघटन होणे व व्यापक व्यासपीठ उभारणे अत्यंत तातडीचे व गरजेचे आहे असे बाळासाहेब आणि मखररामजी सह त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्याला वाटले. तसे संघटन निर्माण करण्याचा प्रयोग आम्ही अकोला जिल्ह्यात करून झाला होता व तो प्रचंड प्रमाणात यशस्वीही झाला. यालाच अकोला पॅटर्न म्हटले जात होते. वरील सर्व बाबींवर सांगोपांग विचार करण्यासाठी व अकोला पॅटर्नचा राज्यस्तरावर प्रयोग कशा प्रकारे करता येईल यावर विचार करण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, मंडल आयोगांतर्गत आलेल्या इतर मागासलेल्या जाती व अल्पसंख्य जाती जमाती आणि मराठे व ब्राह्मण यातील काही प्रमुख पुरोगामी व्यक्तींना या “महाराष्ट्र बहुजन समाज मेळाव्यासाठी” आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.
बहुजन महासंघाची राज्यस्तरावर स्थापना. अकोला पॅटर्नचा राज्यस्तरीय प्रयोगाचा विचार करण्यासाठी व संबंधीत सर्व बाबींवर सर्वकष विचार करून निर्णय घेण्याकरीता बहुजन समाजातील व इतर सर्व शोषित समाजातील किमान एक हजार विचारवंतांचा दिनांक १५-२-१९९३ रोजी मुंबई येथील के. सी. कॉलेज हॉलमध्ये ‘राज्यस्तरीय बहुजन समाज मेळावा’ घेण्याचे निश्चित करण्यात आले. आणि त्याप्रमाणे सर्व संबंधितांना निमंत्रणे देण्यात आली.
मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळ-जवळ सातशे प्रतिनिधी आले होते. सदर मेळावा माळी समाजाचे एक ज्येष्ठ नेते डॉ. ए. टी. भोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते सदर मेळाव्याचे उपस्थित समाज प्रतिनिधींच्या उत्साहपूर्ण जल्लोषात, रीतसर उद्घाटन करण्यात आले.
अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार मखराम पवार हे या राज्यस्तरीय बहुजन समाज मेळाव्याचे निमंत्रक होते. तर मेळाव्याला आमदार विजय मोरे, नवनाथ आव्हाड, शांताराम पंदेरे व इतर अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
बहुजन महासंघाचे शेगाव अधिवेशन
राज्यस्तरीय बहूजन महासंघ स्थापन केल्यानंतर बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या व जिल्हा अध्यक्षांच्या मुंबई येथे झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये दिनांक २१-३-१९९३ रोजी गजानन महाराजांचे शेगाव जि. बुलढाणा येथे बहुजन महासंघाचे राज्यस्तरीय खुले अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार प्रकाश आंबेडकर यांना उद्घाटक म्हणून तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते निळू फुले व राम नगरकर आणि वारकरी संप्रदायातील विद्वान कीर्तनकार श्री. बाबामहाराज सातारकर यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. बहुजन महासंघाच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रचंड संख्येने बहुजन समाज एकत्र येणार असल्यामुळे व बहुजन समाजाचे खरे मनोगत या अधिवेशनात खुलेपणाने व्यक्त होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्र प्रतिनिधींनाही सदर अधिवेशनासाठी निमंत्रित करण्याचे ठरले. व त्याप्रमाणे त्यांना निमंत्रणपत्रे पाठविली.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक २०-३-१९९३ रोजी गजानन महाराज संस्थान मंगल कार्यालय शेगाव येथे सकाळी ९.०० वाजल्यापासून तर रात्री ८.०० वाजेपर्यंत विविध विषयांवर बहुजन समाजातील विचारवंतांची चार चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती.सदर अधिवेशन हे बहूजन महासंघाचे होते त्याठिकाणी कुठेही भारिप बहूजन महासंघ विलीनीकरण झाले नाही, हा खोटा इतिहास अनेकजण सांगत असतात.
पुढे १९९५ विधानसभा निवडणूक लढण्याचे एक वर्षे आधी खुलताबाद येथील बैठकीत भारिप बहूजन महासंघ स्थापन करण्याचा निर्णय खुलताबाद येथील बैठकीत झाला.आणि मग पक्ष निवडणूक आयोगा कडे रजिस्टर झाला.या आणि किनवट मधून भीमराव केराम हे भारिप बहूजन महासंघाचे पहिले आमदार निवडून आले.
१९९५ मध्ये टर्म संपलेल्या पवारांना पक्षाने पुन्हा विधान परिषदेत पाठवले आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असल्याने मखररामजी हे कॅबिनेट मंत्री झाले होते.सोबतच डॉ दशरथ भांडे हे देखील कॅबिनेट मंत्री होते तर रामदास बोडखे
हया सर्व घडामोडी मध्ये बहुजन समाज जागृत करणे आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली अथक परिश्रम घेणारे नेते म्हणून मखररामजी कडे पाहिले जाते.
वंचित बहूजन युवा आघाडी च्या वतीने श्रद्धांजली
वंचित बहूजन युवा आघाडी च्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, सचिन शिराळे, प्रदेश युवा महासचिव
राजेंद्र पातोडे तसेच आमचे सहकारी आणि प्रदेश सदस्य एड सचिन जोरे, अक्षय बनसोडे, शामिभा पाटील, चेतन गांगुर्डे, विशाल गवळी, विश्वजित कांबळे, ऋषिकेश नांगरे पाटिल, रविकांत राठोड, सूचित गायकवाड, अमन शादाब धांगे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.