व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘ऑल इंडिया एड्स कंट्रोल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन’च्या आवाहनाला प्रतिसाद देत, ‘नॅको, नवी दिल्ली’च्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी देशव्यापी ‘रिपोर्ट बंद’ असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्या अंतर्गत अकोला जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ‘एमसॅक’ कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय संघटनेला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने असहकार आंदोलन सुरू केले आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की हे सर्व कर्मचारी एप्रिल २०१७ पासून मूळ वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु नॅको कार्यालयाकडून कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित होणार नाही. ‘नॅको’ मुख्यालयात अनेक राज्यांतील एड्स नियंत्रण संघटनेचे अधिकारी आणि ‘नॅको’ अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत, वेतन फेरतपासणीबाबत कोणतेही ठोस आणि लेखी आश्वासन नसल्यामुळे, एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रतिनिधींनी ठरविले आहे, की मानधनाचे पुनर्परीक्षण होईपर्यंत संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने देशव्यापी आंदोलन केले जाईल. त्याअंतर्गतच शहरात ‘एमसॅक’ कर्मचार्यांनी असहयोग आंदोलन करीत जिल्हा शल्य चिकित्सकांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात आंदोलनाच्या विविध टप्प्यांची माहिती देण्यात आली आहे. या असहयोग आंदोलनात दीपमाला हातोले, रिना धोटे, ज्योती गवई, नारायण इंगळे, सविता बोरकर, उदय पाथरकर, श्रीकृष्ण सोनोने, माधुरी येळणे, शशांक धमगाये, नीरू पटले, गणेश गजघाने, अर्चना ढोणे, निनाद बुलबुले, प्रभाकर तिडके, लीना पटेल, आरती पाठक, सुमेरा खान, सविता बोरकर, नारायण इंगळे, आरती पाठक, लीना पटेल, अपर्णा मुंडे, राजेंद्र आंबेकर, निचळ, प्रभाकर तिडके, अनंत जाधव, श्रीकृष्ण सोनवणे, दीपक काळे, जया गावंडे, प्रवीण रोठे, घाटोळ, मोहम्मद मुशीर आदि सहभागी झाले होते.