शि‍वशंकरभाऊ पाटील अनंतात विलीन

0
874
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांचा ४ आँगस्ट २०२१ रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले़श्री गजानन महाराज संस्थान चा कारभार अत्यंत पारदर्शी,भक्ता भिमुख सेवा, सुविधासाठी आणि त्यांच्या मानव सेवेसाठी सदैव तत्पर राहणारे शिवशंकरभाऊंच्या  निधनाची वार्ता कळताच अख्खे शेगाव शहर आणि परिसरावर शोककळा पसरली़ आपल्या चोख व्यवस्थापनामुळे अख्ख्या जगात वेगळी ख्याती मिळवून श्री संत गजानन महाराज संस्थानचे नाव संपूर्ण भारतात पोहचविणारे एक उत्तम व्यवस्थापन गुरू म्हणून त्यांची ओळख होती़.
श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांच्यावर गेल्या अनेक दिवसापासून उपचार सुरु होते. 3 आॅगस्ट रोजी त्यांची प्रकृती गंभीर झाल्यावर शेगाव येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर हरीश सराफ व बुलढाणा येथील प्रख्यात आयुर्वेदिक तज्ञ डाक्टर गजानन पडघान हे त्यांच्या प्रकृती कडे लक्ष ठेवून होते. उपचार सुरू असतांना ४ आँगस्ट रोजी दुपारी ४ वाजता काळाने त्यांचेवर झडप घातली़. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्ष होत़े. त्यांच्या अचानक निघून जाण्याने धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे़.
वयाच्या १८ व्या वर्षी भाऊंवर आली संस्थानची जबाबदारी
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांचेवर तरूण वयातच आली़ शिवशंकर सुकदेव गणेश पाटील यांचा जन्म 12 जानेवारी 1940 रोजी झाला. 31 आॅगस्ट 1962 या तारखेपासून शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त बनले. 1969 ते 1990 पर्यंत असे सतत 20 वर्षे श्री संत गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव चे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत होत़े वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी स्विकारून आज संत गजानन महाराजांची किर्ती आणि मंदिरातील योग्य व्यवस्थापन संपूर्ण जगासमोर ठेवली आहे़ आजही भाऊंच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल देशातील तिरूपती बालाजी संस्थान, शिर्डीचे साई संस्थानकडूनही घेण्यात आली असून शिर्डी संस्थानकडून गजानन महाराज संस्थानमधील अनेक कार्यपध्दती अमलात आणली आहे़
शेगाव नगराध्यक्ष पदाचीही निभविली भुमिका
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदही भुषविले आहे़. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून 1974 ते 1979 पर्यंत सतत पाच वर्षे त्यांनी कार्य पाहिले़ शिस्त आणि व्यवस्थापन गुरू म्हणून ओळख असलेल्या भाऊंना नागरीकांनी प्रचंड मताधिक्यानी विजयी केले़. त्यांनी ५ वर्षे नगराध्यक्ष पद भुषवून शेगाव शहरात अनेक महत्वाचे विकास कामेही करून शहराचा चांगला विकास केला़.
अनेक पुरस्कारांसाठी भाऊंनी दिला नकार
भाऊ कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शेगाव भेटी आलेले देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार त्यावेळी म्हणाले मी शिफारस करतो भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं, सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे, भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहात, अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला आणि तुम्ही काय करीत आहात? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी, चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे,आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही, आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही आणि तशी वस्तूने पण होत नाही, माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो ते सुत्र आम्ही पाळले.
श्रीं नी घालून दिलेली शिस्तीचा भाऊंनी केले सदैव अनुकरण
श्रींनीच नियम घालून दिले की, ‘पैसा साचू देऊ नका आणि यात्रा थांबू देऊ नका, पैशाला स्पर्श करू नका आणि पैसा कुणाकडे मागू नका, माज्या अंगाला स्पर्श करू नका. पैसा भक्तांना दानपेटीत टाकायला सांगा. मठात रात्रीच्या वेळी स्त्रियांना थांबू देऊ नका आणि कुणालाही तीन दिवसांपेक्षा जास्त मठात राहू देऊ नका. ‘श्रींनी घालून दिलेल्या नियमानुसार शिवशंकर भाऊ हे सर्व नियम संस्थानच्या बाबतीत तंतोतंत पाळतात.
भाऊसाहेबांनी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले
शेगाव संस्थानकडून सुमारे 3500 सेवाधारी संस्थानच्या विविध सेवा प्रकल्पांवर कार्यरत दिसून येतात. तेवढेच सेवाधारी वेटिंग’वर कायम असतात. भाऊसाहेबांनी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारली. डोनेशन न घेता इथे शैक्षणिक कार्य होताना दिसून येते. याच शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर तसेच विदेशातसुद्धा कार्यरत आहेत. आदिवासी लोकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्यांच्यासाठी अधिकाधिक सेवाकार्य कसे करू शकत, त्यांना मुख्य प्रवाहात कशा प्रकारे आणू शकतो, त्यांच्या संस्कृतीला धक्का न लावता त्यांचे प्राचीन ज्ञान इतरांना कसे उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी भाऊसाहेबांचे अविरत प्रयत्न सुरू असतात.
श्रीं च्या सेवेतच गेले भाऊंचे संपूर्ण आयुष्य
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे संपूर्ण आयुष्य श्री संत गजानन महाराज यांच्या सेवेतच अर्पण झाले आहे़ शेगावसह पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, ओंकारेश्वर येथील संस्थानच्या प्रत्येक कार्यावर त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याने नजर ठेवून तेथील सर्व कामांवर व्यवस्थितपणे दक्षता भाऊंनी ठेवली आहे़ तसेच संस्थानच्या सेवेसाठी 2 हजार मानसेवी, 3 हजार स्वयंसेवक आणि 3 हजार सेवाधारी युवकांची प्रतीक्षा यादी आहे. दररोज 50 हजार भाविकांना प्रसाद वाटप व्यवस्था, भक्ती निवासातील 3 हजार खोल्या, वैद्यकीय लोकोत्तर सेवाकार्य, अभियांत्रिकी, आदिवासी शाळा, विकास योजना, हजारो वारकरी दिंडयांना भजनी साहित्य वाटप आजही शिस्तबद्ध सुरू आहे.
कोरोना काळातही भाऊंनी संस्थानच्या माध्यमातून केली मदत
मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना संसर्गाने थैमान घातले होते़ त्यावेळेस रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात बेड उपलब्ध होत नव्हते़ त्यावेळे श्री गजानन महाराज संस्थानने पुढाकार घेत संस्थानच्या आनंद विहार मध्ये 500 बेडचे स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारून शासनाला अत्यावश्यक मदत केली़.
Previous articleगोंधनापूर चा किल्ला एक भुईकोट
Next articleशिक्षक व्हायचंय..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here