दत्ता महाले
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम: खासगी रुग्णालयात उपचार घेवून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा परतावा महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मिळणार असल्याचे चुकीचे संदेश समाज माध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यामुळे कोरोनावरील उपचाराचा वैद्यकीय खर्च परतावा मिळण्याच्या आशेने विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र, या संदर्भात जिल्हा प्रशासनाला अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासंकडे प्राप्त अर्जाची पडताळणी केल्यानंतर असे आढळून आले आहे की, अनेक अर्ज हे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत अंगीकृत नसलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांचे आहेत. अशा खाजगी रुग्णालयांशी संबंधीत अर्जाबाबत महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत खर्चाचा परतावा करण्याची कुठलीही तरतूद नाही. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अंगीकृत असलेली देवळे हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, वाशिम क्रिटिकल केअर हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली होती. या रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना जर योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाला नसेल, तर असे लाभार्थी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती जिल्हा कार्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, हॉटेल रॉयल पॅलेसच्या बाजूला, वाशिम याठिकाणी आपले तक्रार अर्ज सादर करू शकतात. सोबत उपचारासंबंधीत सर्व कागदपत्रे व मूळ बिल अथवा पावती सादर करणे आवश्यक राहील.
आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा
अंगीकृत रुग्णालयांमध्ये जर रुग्णाने संमतीपत्र देवून स्वखर्चाने उपचार घेतला असेल, अशा रुग्णांचे अर्ज किंवा तक्रारी ग्राह्य धरला जाणार नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसंबंधी आधिक माहिती किंवा तक्रारीकरिता निशुल्क हेल्पलाईन क्र. १५५३८८ अथवा १८०० २३३ २२०० या क्रमांकावर किंवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत सुद्धा अद्याप कोणतेही निर्देश शासनामार्फत सध्या प्राप्त झालेले नाहीत. या अनुषंगाने सामाज माध्यमातून फिरत असलेले संदेश हे चुकीचे असून कोणत्याही व्यक्तीने यावर विश्वास ठेवू नये, असे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.