22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक घरांमध्ये नळजोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून बुधवारी 28 जुलैरोजी पातुर, बाळापुर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक व इतर ग्रामपंचायत स्तर कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या प्रशिक्षणामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) कार्यकारी अभियंता राजीव फडके, अनिस खान, उपकार्यकारी अभियंता सुरेश तिडके यांनी व जिल्हा प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखड्यामध्ये गावपातळीवरील नियोजन प्रक्रिया त्यामध्ये लोकसहभागाचे महत्व व विविध संकल्पना, यादरम्यान करावयाचे विविध उपक्रम, माहिती संकलित करावयाचे प्रपत्र व कोबो कलेक्ट टूल च्या माध्यमातून संकलित करावयाची माहिती याबाबतची विस्तृत माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. आजच्या सत्रामध्ये प्राथमिक माहिती संकलन प्रपत्र व कोबो कलेक्ट टूल चा वापर कसा करावा याविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षण प्राप्त तालुक्यांचे पुन्हा 30 जुलै रोजी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे पडताळणी वजा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये शाखा अभियंता मिलिंद जाधव शाखा अभियंता ए. वी. देशमुख यांच्यासह माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, मूल्यमापन व संनियंत्रण सल्लागार राहुल गोडले, अभियांत्रिकी तज्ञ सागर टाकळे, मनुष्यबळ विकास तज्ञ प्रवीण पाचपोर यांनी आभासी पद्धतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. उद्या 29 जुलै रोजी बार्शिटाकळी, मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सकाळी व अकोला तालुक्यातील कर्मचारी पदाधिकारी यांना दुपारी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रथमच होतोय कोबो कलेक्ट टूल चा वापर
राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोबो कलेक्ट टूल या मुक्तस्त्रोत पद्धतीच्या डिजिटल माध्यमाचा वापर, माहिती संकलित करून गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रथमच केला जात आहे. ज्याद्वारे ग्रामपंचायत स्तरावरून एकाच वेळी आराखडे प्राप्त होणार आहेत. या आराखड्याच्या पडताळणीनंतर आराखडयाना 15 ऑगस्टच्या संभाव्य ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायत सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.