व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अतिवृष्टीत बाधीत झालेल्या म्हैसांग, रामगांव, दापुरा, अंबिकापूर, आपातापा, घुसर, उगवा व सुकोडा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा कृषि अधिकारी कोताप्पा खोत आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे नदी व नाल्या काठच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे ज्या भागात पाणी जमा होवून पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागात कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरीता तज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या समन्वयाने नियोजन करु. तसेच पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती विमा कंपनीना 72 तासात द्या. पिक विमाबाबत काही अडचणी किंवा तक्रार असल्यास महसुल व कृषि विभागास कळविण्याचे आवाहन कृषी मंत्री भुसे यांनी केले.