व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत येथील केआयटीएस संस्थेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या 18 मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करून अकोल्याचे नाव चमकवले. यातील बहुतांश मुली ग्रामीण भागातील तसेच आर्थिक कमकुवत कुटुंबातील असून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन रोबोटिक्स प्रशिक्षक काजल राजवैद्य, विजय भट्टड यांनी केले.
रोबोटिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल तसेच अन्य शाखांचा समग्र अभ्यास होतो तसेच थिअरी पेक्षा प्रॅक्टीकलवर भर दिला जात असल्याने मुलींना ज्ञानाचा लाभ होतो, असेही काजल राजवैद्य म्हणाल्या. फर्स्ट रोबोटिक्स स्पर्धेत केआयटीएसची चमू निवडली गेली. तसेच महाअंतिम फेरीत 11 देशातून तीन हजार पैकी 20 चमूचे संशोधन निवडल्या गेले. त्यात अकोल्याच्या मुलींनी तयार केलेल्या पेरणी यंत्राला प्रभावशाली प्रकल्प अवार्ड मिळाला. जगभरातून मुलींचे कौतुक करण्यात आले. प्रॅक्टिकल आधारित शिक्षणाचा विद्यार्थ्यांना अधिक लाभ होऊ शकतो या विचाराने आम्ही थिअरी ऐवजी प्रॅक्टिकलवर भर दिला. त्यातून कौशल्य वाढीला चालना मिळालेली दिसते. तसेच केवळ 18 मुलींवर आम्हाला थांबायचे नाही तर ही संख्या वाढवायची आहे. महिला सक्षमीकरण ख-या अर्थाने घडवायचा आहे, असेही सांगण्यात आले.
स्वयंचलित पेरणी यंत्र
रोबोट शेतीला कसे उपयुक्त ठरू शकते असा विचार करून मुलींनी स्वयंचलित पेरणी यंत्र तयार केले. त्यात आधुनिक तंत्राचा वापर केला. त्याद्वारे एका एकरात एका तासात पेरणी केली जाऊ शकते. 10 शेतक-यांना यंत्र पुरवले असून त्यांच्याकडून फिडबॅक घेण्यात आल्याचे राजवैद्य तसेच मुलींनी सांगितले. देशातील मोठ्या कंपन्यांनी देखील प्रयोगाची दखल घेतली. गायत्री तावरे, स्नेहल गवई, अंकिता वजिहे, अर्पिता लंगोटे, निकिता वसतकर, रुचिका मुंडाले, सायली वाकोडे, प्रणाली इंगळे, गौरी गायकवाड, नेहा कलळकार, पूजा फुरसूले, स्वाती सरदार, सानिका काळे, आचल दाभाडे, दिया दाभाडे, गौरी झांबरे, प्रांजली सदाशिव या मुलींनी रोबोटिक्स मध्ये उंच भरारी घेतली आहे.
मुलींचे पालकत्व स्वीकारा
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणा-या मुलींना पुढील शिक्षणासाठी भक्कम आधार हवा आहे. त्यासाठी दात्यांना त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन करण्यात आले. तसे झाल्यास जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अंध विद्यार्थ्यांसाठी किटची निर्मिती
रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अंध विद्यार्थ्यांनाही लाभ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी किटची निर्मिती करण्यात येत आहे. जेणेकरुन अंध विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहणार नाहीत असेही काजल राजवैद्य म्हणाल्या.