जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती

0
413
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक  आयोगाने केली आहे.
राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी दि. १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु दि.७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
Previous articleजिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव
Next articleरोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here