अमरावती विभागात कोरोना सोबत सारीचाही धोका वाढला!
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनामुळे अनेक जणांना प्राणापासून मुकावे लागले असतानाच सारी आजारानेही रुग्ण दगावत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. अमरावती विभागात आतापर्यंत 61 रुग्णांचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. विभागातील आकडेवारी लक्षात घेता अवघे 30 ट्कके मृत्यू अकोल्यात झाल्याची नोंद आहे.
कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात सारीच्या रुग्णांचा धोकाही वाढतोय. गेल्या सहा महिन्यात अकोल्यात 20 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाला. सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनकच राहीली आहे. आतापर्यंत 57 हजार 608 एवढे नागरिक कोरोनाने बाधित झाले. त्यापैकी उपचारादरम्यान 1128 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्हयात कोरोनाचा विळखा घटट् बसला असतांना सारी आजारानेही प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सारीच्या आजारालाही तेवढ्याच गंभिरतेने घेत आहे. कोरोनासारखीच सारीच्याही प्रत्येक रुग्णाची नित्याने चाचणी केली जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा व महापालिका आरोग्य यंत्रणेमार्फत रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे. कोरोना हा मागील वर्षभरापासून आलेला आजार असला तरी सारी हा मात्र जुनाच आजार आहे. श्वसन विकार, न्युमोनिया, टीबी या सारख्या विकाराचं गंभीर रुप झाल्याने फुफ्फुसाला इंफेक्शन होते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो, ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्याचा परिणाम शरीराच्या सर्व भागावर होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. या आजाराला सारी म्हटलं जातं. पूर्वीपासून असलेला हा आजार पुढील काळात देखील राहण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
ही आहेत लक्षणे
एकदम सर्दी येणे, तापाचे प्रमाण जास्त, खुप अशक्तपणा, न्यूमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे.
यांना आहे सर्वाधिक धोका
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कमी प्रतिकार शक्ती असणा-या व्यक्ती, मधुमेह, हदयरोग असलेली व्यक्ती.
आतापर्यंत झालेले मृत्यू
अकोला- 20, अमरावती – 12, बुलडाणा- 13, वाशीम – 1, यवतमाळ- 15, एकूण- 61