व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: ‘न कळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहुल घेते.. कितीदा हसूनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे’ हे गीत सादर करुन अकोल्याच्या श्रुती रविप्रकाश भांडे हिने मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स कार्यक्रमात शुक्रवारी रात्री धमाल उडवली. या कार्यक्रमात सादर होणारी श्रुती वैदर्भीयांचे प्रतिनिधित्व करत आहे.
तिने सादर केलेल्या भावगर्भ गीताने परीक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. संचालनकर्ती मृण्मयी देशपांडे ही देखील प्रभावित झाली. रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली श्रुती भांडे विदर्भातून निवड झालेली एकमेव स्पर्धक आहे. तसेच कार्यक्रमातील सर्वात लहान स्पर्धक असली तरी ‘छोटा फटाका बडा धमाका’ असे तिचे वर्णन होत आहे. श्रुती केवळ सात वर्षांची आहे. अकोल्याच्या माउंट कारमेल शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे.
तिचे आजोबा भगवान शेषराव भांडे यांच्यापासून तिने प्रेरणा घेतली. तिचे वडील रवीप्रकाश भांडे हे संगीत विशारद आहेत. ते रियाज करत असताना श्रुती लहानपणापासून पाहत होती. त्यातून प्रभावित होऊन ती तयार झाली. तिची आई प्रिया भांडे यांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले. तिच्यातील गणागुण हेरले. आई वडील व्यवसायाने शिक्षक आहेत. ती पाच वर्षाची असताना तिने मुंबईला झालेल्या सुपरस्टार सिंगर स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हा प्रख्यात गायिका अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली यांना श्रुतीने मोहीत केले होते. आतावर राज्यात विविध स्पर्धात सहभागी होऊन तिने अकोल्याचे नाव चमकवले.