शाळा सुरू होणार म्हणून मुख्यालयाकडे निघाले होते शिक्षक!
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्यात कार पडल्याने पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी १३ जूनच्या मध्यरात्री घडली. यामध्ये लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. चौघेही जण शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याकामासाठी रस्त्याच्या बाजूचाच मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्डयातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन त्यातच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खड्डयामध्ये वाहनाची लाईट दिसत असल्याने काही गावकºयांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकºयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार अनिल भारती, शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकºयांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या मध्ये दोन मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरून दोघांची नांवे अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून त्यांच्या लोणार येथील कुटुंबियांशी संपर्क साधला असून ते काही वेळातच सेनगाव येथे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतर दोघांकडे ओळखपत्र सापडले नसल्याने त्यांची ओळख पटली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, १५ जूनपासून शाळा सुरु होत असल्याने शिक्षकांना मुख्यालयी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हे चौघे जण मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी जात असावे अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.