शिक्षण विभागाच्या आदेशामुळे निर्माण झाला नवा पेच
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: राजाने मारले अन पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची, याचा प्रत्यय सध्या शिक्षण क्षेत्रात येत आहे. कोरोना महामारीने गेल्या दीड वषार्पासून शाळा बंद आहेत. त्याचा परिणाम जसा विद्यार्थी व पालकांवर झाला तसाच कॉन्व्हेंटच्या शिक्षकांवरही झाला आहे. एकीकडे शासनाने तसेच न्यायालयाने विद्यार्थ्यांकडून फी वसुली करतांना कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा अडवणूक करू नये असे आदेश दिल्याने शासन न्यायालय, संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थी-पालक यांच्यात नवा पेच प्रसंग उद्भवला आहे.
सर्वोच्च न्यायालय दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार शुल्क भरणा न केल्याने विद्यार्थ्यांची टी.सी, मार्क्स शिट, निकाल व इतर कागदपत्र अडवता येणार नाही व विद्याथ्यार्ला आॅनलाइन क्लासमधून काढता येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. या आदेशाचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहे. स्वयंअर्थसहायित असणाºया कॉन्व्हेन्टचे संपूर्ण व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाºया फीसवर अवलंबून असते. अशात कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून शिक्षक इमाने इतबारे आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. शासन तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी प्राप्त होत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापनाला शिक्षकांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे विनावेतन काम करणाºया कॉन्व्हेंटच्या शिक्षकांवर उपासमारीला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्यात यावे
कोरोनामुळे उद्भवलेल्या पेच प्रसंगामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी व पालक अडचणीत आले असून त्यावर त्वरित मार्ग निघणे महत्वाचे आहे. कॉन्व्हेन्टचे शिक्षक गेल्या दीड वर्षापासून आॅनलाईन अध्यापन करीत आहेत. परंतु विद्यार्थ्यांची फी वसूल होत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापन वेतन देण्यास सक्षम नाही. त्यामुळे वेतना अभावी शिक्षकांना उपासमार सहन करावी लागत आहे. या परिस्थितीत शासनाने त्वरित तोडगा काढावा यासाठी आपण लवकरच शिक्षण मंत्राची भेट घेणार असून कॉन्व्हेन्ट शिक्षकांच्या वेतनासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करणार आहे.
– प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष