वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव:गर्भधारणा असतानाही डॉक्टरने महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना येथील सामान्य रुग्णालयात घडली. या प्रकारासंदर्भात महिलेचा पती किशोर जाधव यांनी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकरराव वानखडे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांना तिसरे अपत्य नको असल्यामुळे पत्नीची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यासाठी त्यांनी पत्नीला सामान्य रुग्णालयात 2 फेब्रुवारीरोजी भरती केले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकरराव वानखडे यांनी फिर्यादीच्या पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. मात्र टाक्यांमधून पस निघून टाके तुटल्याने परत टाके देण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीला 20 फेब्रुवारी 2021 रोजी सुटी देण्यात आली. यानंतर एक महिन्याने पोट वाढायला लागले म्हणून फिर्यादी व त्याची पत्नी डॉ. वानखडे यांच्याकडे उपचारासाठी गेले. त्यांनी नाममात्र सुज असल्याचे सांगून औषधोपचार केला. मात्र त्यानंतर सुद्धा फिर्यादीच्या पत्नीचे पोटाचे दुखणे थांबत नसल्यामुळे त्यांनी 22 एप्रिल 2021 रोजी डॉ. गणेश महाले यांच्याकडे तपासणी केली. त्यांनी सोनोग्राफी केली असता ती 5 महिने व 1 आठवड्याचा गर्भ असल्याचे निदान झाले. त्यामुळे जाधव कुटूंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली.
शस्त्रक्रियेपूर्वी सोनोग्राफी का केली नाही!
वास्तविक पाहता डॉ. वानखडे यांनी शस्त्रक्रियेपूर्वी महिलेची योग्य ती तपासणी करणे आवश्यक होते. परंतू तपासणी न करताच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. सदरची प्रक्रिया ही ग्रॉस निग्लीजन्स या प्रकारात मोडते. या प्रकाराने संबधित महिलेला मानसिक व शारिरीक यातना सहन कराव्या लागल्या. विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक यांना या प्रकाराबाबत कल्पना असतानाही त्यांनी कोणतीही कारवाई डॉ. शंकरराव वानखडे यांच्यावर केली नाही. आता या प्रकरणात आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चौहाण काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.