क्षितीजच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी-कदम यांचे आवाहन
योगेश फरपट |
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मासिक पाळी आलेल्या मुलीला किंवा महिलेचा कित्येक लोक अजूनही अंधश्रद्धा आणि अज्ञानापोटी तिरस्कार करतात. वास्तविकता हा विषय टाळण्याचा नव्हे समजून घेण्याचा आहे. मासिक पाळी आलेल्या मुलीला किंवा महिलेला दैनंदिन व्यवहारापासून दूर ठेवले जाते. हे साफ चुकीचे आहे असे स्पष्ट करीत तिला समजून घेण्याची व स्विकारण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन क्षितीज या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी-कदम यांनी केले आहे.
28 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळी विषयासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी क्षितीज ही सामाजिक संस्था प्रामुख्याने राज्यभर काम करीत आहे. आरोग्याविषयी समाजातील निगेटिव्ह विचारसरणीच्या लोकांच्या मनपरिवर्तनासाठी संस्थेच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी-कदम झटत आहेत. मासिक पाळी विषयाची उकल करतांना त्यांनी क्षितीजच्या कामकाजावर प्रकाश टाकला. महिला व मुलांच्या आरोग्य शिक्षणासाठी क्षितीज ही संस्था काम करते. ब्लिड दि सायलंस हा त्यापैकी एक विशेष उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हयामध्ये क्षितीजच्या समन्वयकामार्फत ग्रामिण भाग, आदिवासी भागासह विविध शहरात मासिक पाळी विषयी जनजागृती करणे, सॅनिटर नॅपकिनचे वाटप, आरोग्य स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आदीवर भर दिल्या जातो.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे व्यापक स्वरुपात कार्यक्रम घेवू शकले नाही. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुरुषांना समोर येण्याचे आवाहन केले आहे. क्षितीजचे काम फक्त आता महाराष्ट्रात मर्यादीत राहिले नाही तर भारतातील अनेक राज्यात क्षितीजने काम सुरु केले आहे. या कामात त्यांना अनेक व्यक्ती, संस्थेकडून सॅनिटरी नॅपकिन किट वितरणासाठी मिळत आहे. समाजात ख-या अर्थाने तरुण तरुणीही सोशल मिडीयावर सुरु असलेल्या जागृतीपर अभियानाच्या माध्यमातून बोलू लागले आहेत. आपले अनुभव शेअर करीत आहे. मुक्त व निर्भीडपणे क्षितिज फाउंडेशनच्या वेगवेगळ्या स्पर्धांत सहभाग नोंदवत व्यक्त होऊ लागले आहेत. मासिक पाळी म्हणजे काही शाप नाही, मासिक पाळी म्हणजे काही पाप नाही उगाच का मग त्या दिवसांत स्त्रियांना दूर ठेवावं यासाठी थोडासा बदल करूया आपल्या डोक्यात आणि आपल्या विचारांत. बोलत, संवाद साधत साद घालूया अशा प्रकारचे आवाहनही स्नेहल चौधरी-कदम यांनी यामाध्यमातून केले आहे.
चळवळीत कुटूंबाचा मोलाचा सहभाग
क्षितीजच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी-कदम यांना या चळवळीत कुटूंबाचे विशेष पाठबळ लाभले आहे. लग्नाआधी त्यांचे वडील ज्ञानेश्वर चौधरी व आई पुष्पाताई यांनी या सामाजिक चळवळीत मोलाची मदत व पाठिंबा दिला आहे. लग्नानंतर त्यांचे पती सचिन कदम जे पोलिस विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विशेष सहकार्य, मार्गदर्शन व पाठबळ मिळत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
ब्लिड दि सायलंस मधून घडतेय परिवर्तन
क्षितीजच्या माध्यमातून 2015-16 पासून ब्लिड दि सायलंस या उपक्रमाची सुरुवात झाली. मासिक पाळीविषयी आजही अनेक भागात महिलांना दूर ठेवल्या जाते. अशा घटकांचा शोध घेवून त्या भागात आरोग्य संस्था, महिला व बालकल्याण विभागाला सोबत घेवून प्रभावी जनजागृती केली जाते. आतापर्यंत 60 हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहचण्यात यश आले आहे. केवळ या दिवसानिमित्तच नव्हेतर दरमहिन्याच्या 28 तारखेला मासिक पाळीविषयी जनजागृती व्हावी यासाठी ब्लीड दि सायलंस टॉक सिरिज अंतर्गत महिला व मुलींच्या आरोग्याविषयी वेगवेगळ्या तज्ञ्जांकडून मार्गदर्शन दिल्या जाते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोल्याचे प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मालोकार यांचेही मोलाचे मार्गदर्शन नेहमी लाभते.