जीवनातील वाईट क्षण अडथळा नसून तुमच्या व्यक्तीमत्वातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मानली, तर अपयश देखील सकारात्मक वाटू लागेल. हाच विचार विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे काळाची गरज वाटते आहे. कारण गेल्या दहा दिवसात बुलडाणा जिल्ह्यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. यामध्ये १ नर्सिंगची विद्यार्थीनी, ३ बारावीचे विद्यार्थी, तसेच २ पदवीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे निरनिराळी असली तरी या वयोगटातील होणाºया आत्महत्या हा समाजातील चिंतेचा विषय बनला आहे. १० सप्टेंबरोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन होता. या सप्ताहात सरकारच्या प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत जनजागृती केली गेली. आणि याच सप्ताहात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात हे खेदाने नमुद करावेसे वाटते.
समाजातील यशस्वी जीवनाच्या मापदंडात परिक्षांमधील गुण किंवा टक्केवारी मोजली जाते. मग ही टक्केवारी गाठण्यासाठी सुरु होते, विद्यार्थ्यांची जीवघेणी धडपड! आणि परिक्षा ही स्पर्धात्मक जीवनातील प्रत्येक घडीला सामोरे जावे लागणारा अविभाज्य घटक बनून जातो. त्यामुळे परिक्षांमधील संभाव्य अपयशाची भिती किंवा स्पर्धेत मागे पडू ही भिती अस्वस्थता वाढवते. आणि यामधूनच विद्यार्थी आत्महत्येकडे वळतात. या अपयशानंतर पाचवी, सहावीतील विद्यार्थी ज्यांना मृत्यूचा नेमका अर्थही माहिती नाही, अशी मुलं आत्महत्येला कवटाळतात. या सर्व बाबींबरोबर या प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे आज मुलांमध्ये नकार पचवण्याची क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच अगदी कार्टुन न पाहू देण्याचे किंवा मोबाईल गेम न खेळू देण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुद्धा मुलांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर येतांना दिसतात.
अजून एक खटकलेली बाब म्हणजे प्रसार माध्यमांमधून एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीने केलेल्या आत्महत्येचे वारंवार होणारे प्रसारण त्यादरम्यान आत्महत्येसाठी वापरली जाणारी साधने, आत्महत्येचे कारण याचे अतिरेकी व वारंवार होणारे प्रक्षेपण हे घराघरामध्ये अगदी जिव्हाळ््याचा विषय असल्यासारखे पाहिले जाते. यामध्ये मुलांचाही सहभाग असतो. याचाही परिणाम नकळत मुलांच्या मनावर होतो हे नाकारता येणार नाही. या सर्व बाबींकडे आई-वडीलांनी गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून मुलांशी त्यांचे मित्र बनून संवाद साधणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांच्या मनाचा ठाव घेता येईल.
भविष्यातील स्वप्ने रंगवतांना मुलांनीही वास्तविकतेचा विचार करायला हवा. आपण विशिष्ट परिक्षेत पास झालो नाही म्हणून पर्याय संपत नाहीत आणि आयुष्य तर नाहीच नाही. .. अपयश पचवण्यासाठी आत्मघात हा निश्चितच पर्याय नाही.
शेवटी एकच सांगावेशे वाटते की,
‘‘हौसलो के तरकश में,
कोशिशो का वह तीर जिंदा रखो
हार जाओ चाहे, जिंदगी में सबकुछ,
फिर सें जितनें की उम्मीद जिंदा रखो …
– सौ. अर्चना योगेश फरपट
संपादक, वºहाड दूत, अकोला.