व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकाेला: खरिपाची पेरणी ताेंडावर आली असतांना आतापर्यंत केवळ 36 टक्केच पीक कर्ज वितरण झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 433 काेटी 10 लाख रुपये पीक कर्ज 47 हजार 865 शेतक-यांना वाटप करण्यात आले. अद्याप अनेक शेतकरी कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत.
गेल्या वर्षी महात्मा ज्याेतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजनेचा लाभ बहुसंख्य शेतक-यांना मिळाल्याने मागील रब्बी हंगामात अनेक शेतक-यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज मिळू शकले. शेतक-यांची अडचण लक्षात घेवून खरिप हंगामासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचना मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांनी जिल्हाधिका-यांसह बँक प्रशासनाला दिल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक कर्ज वितरणाला काहीअंशी ब्रेक लागल्याने अनेक शेतक-याना अद्याप कर्ज मिळू शकले नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शेतक-यांची निकड लक्षात घेवून बँकांची वेळही सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. मात्र शेतक-यांव्यतिरिक्त बँकेत इतर नागरिक गर्दी करीत असल्याने शेतक-यांची कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात विलंब होत आहे.
अर्ज केल्यावर दुस-याच दिवशी रक्कम जमा
मागील वर्षी कर्ज घेणा-या शेतक-यांनी जर संपूर्ण कर्जाची रक्कम भरली असेल. त्यांचे खाते निल असेल. अशा शेतक-यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढल्या जात आहेत. अर्ज केल्यावर दुस-याच दिवशी संबधित शेतक-याच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे.
पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निकाली काढा
पीक कर्ज वितरणाचे 1200 कोटीचे उद्दीष्ट अकोला जिल्ह्याला मिळाले आहे. त्यापैकी आतापर्यत 433.10 कोटी रुपये 47 हजार 865 शेतक-यांना वाटप झाले आहे. बँक अधिका-यांच्या संपर्कात आहोत. पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. – आलोक तारेनिया, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक अकोला.