वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :वैश्विक महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक सर्वच पातळीवर पिचले गेले असून त्यामध्ये आजारी रुग्णांना ने आण करण्यासाठी वापरल्या जाणा-या रुग्णवाहिका चालकाकडून रुग्णाच्या नातलगांसाठी प्रचंड लुट होत आहे.
गत दीड वर्षापासून कोविड 19 च्या प्रार्दुभावामुळे सर्वसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ने आण करण्यासाठी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय उरला नाही. याचाच फायदा उचलत रुग्णवाहिका संचालक व चालकांनी रुग्णांच्या नातलगांची आर्थीक लूट सुरु केली आहे. विशिष्ट किलोमिटरच्या अंतरासाठी ज्या ठिकाणी एक हजार रुपये भाडे अपेक्षीत असते. त्याठिकाणी चार ते पाच हजार रुपये उकळण्याचा धंदा चालवला होता. या सर्व प्रकाराची दखल घेवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शनिवारी नविन दरपत्रक तयार करून या दरपत्रकाचे स्टिकर प्रत्येक रुग्णवाहिकेच्या दर्शनीय भागावर लावण्यात आले. मात्र 24 तासातच लावलेले दरपत्रक बहुतांश रुग्णवाहिका चालकांनी काढून कचरापेटीत फेकल्याचे चित्र रविवारी अनेक ठिकाणी दिसून आले. आरटीआेने राबवलेल्या उपक्रमालाच रुग्णवाहिका चालकांनी तिलांजली दिल्याने आरटीआे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.