वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित झाल्याने रुग्णांची सोय होईल तसेच या बाबत जिल्हा स्वयंपूर्ण करू अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
15 मे रोजी येथील स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे डॉ. शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते परंतु सध्याच्या स्थितीमध्ये उद्घाटनाची औपचारिकता न करता प्लांट कार्यान्वित झाल्याची घोषणा केली.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज तेवढ्याच प्रमाणात भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा निर्माण होणारा तुटवडा पाहता कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे हवेतून ऑक्सिजन शोषून ते सिलिंडरमध्ये भरण्यात येणार आहे. यामुळे गंभीर परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडयाचा प्रश्न आता कायमचा दूर झाला आहे. जिल्ह्याला दररोज जवळपास 16 मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांटव्दारे 80 जम्बो सिलिंडर हवेतील ऑक्सिजन 24 तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात येईल.
जिल्हा स्वयंपूर्ण करणार
कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वयंपूर्ण होत असताना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वयंपूर्ण करणार असल्याचा विश्वास डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. तसे झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. तसेच कोविडमुळे मृत्यू होणा-यांची संख्याही कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
इतर ठिकाणी लवकरच प्लांटची उभारणी
जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत असून बुलडाण्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी लवकरच उभारण्यात येणार आहे.