वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
– ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा साठाही तुलनेने कमीच
अकोला: सोमवार 10 मे रोजी आलेला लसींचा साठा संपुष्टात आल्याने मंदावलेली लसीकरण मोहीम शनिवारी सकाळी आलेल्या तुटपुंज्या साठ्याच्या भरवशावर सुरू झाली परंतु आगामी दोन दिवसांमध्ये हा साठाही संपुष्टात येणार आहे. विभागातील पाच जिल्ह्यांना शासनाकडून दरवेळी तुटपुंजा साठा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने लसीकरणाची मोहीम वारंवार प्रभावीत होत आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी शनिवारी सकाळी एकूण 20 हजार 480 कोव्हॅक्सीन लसींचा साठा उपलब्ध झाला. त्यापैकी अकोला जिल्ह्यासाठी 2 हजार 400, अमरावती जिल्ह्यासाठी 4 हजार 800, बुलडाणा जिल्ह्यासाठी 4 हजार 300, वाशिम जिल्ह्यासाठी 5 हजार 600 आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 3 हजार 380 कोव्हॅक्सीनच्या लसींचे वितरण करण्यात आले. त्यामुळे पाचही जिल्ह्यांमध्ये थंडावलेल्या लसीकरण मोहिमेला काही प्रमाणात चालना मिळाली आहे. शनिवारी कोविशील्ड लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने प्राप्त झालेल्या कोव्हॅक्सीन लसींचा पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी उपयोग केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑक्सिजनचा साठा कमी
अमरावती विभागातील अकोला आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये वगळता दोन्ही जिल्ह्यांमधील इतर शासकीय रूग्णालयांमध्ये अनुक्रमे 43 आणि 08 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होते. अमरावती जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये 413, बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये केवळ 80, वाशिम जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये 780 ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध होते. पाचही जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या पाहता तुलनेने ऑक्सिजनचा साठा कमी असल्याचे दिसून आले.
रेमडेसिवीरचा साठाही तुटपुंजाच
पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांच्या तुलनेत उपलब्ध असलेला रेमडेसिवीरचा साठाही तुटपुंजाच आहे. प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात 1670, अमरावती जिल्ह्यात 1720, बुलडाणा जिल्ह्यात 950, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 2967 आणि यवतमाळ जिल्ह्यात 1432 रेमडेसिवीर उपलब्ध होते.